एरवी शांत राहणाऱ्या, जेवढय़ास तेवढे बोलणाऱ्या, पण आपल्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या आणि आपले खासगी आयुष्य ग्लॅमरपासून दूर ठेवणाऱ्या दीपिका पदुकोणचा नवा रंग ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या नुकत्याच झालेल्या भागात पहायला मिळाल्याने रणवीरच्या प्रेमामुळे तिच्या आयुष्यात खरोखरच जादू झाली आहे, अशी चर्चा खुद्द तिच्या सहकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. दीपिकाचा ‘फाइंडिंग फॅ नी’ शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने, दीपिका आणि अर्जुन कपूरबरोबर कपिलने एक खास भाग चित्रित केला होता. या भागात पहिल्यांदाच हसरी-खेळती आणि कुणाचीही तमा न बाळगता मस्ती करणारी दीपिका प्रेक्षकांना पहायला मिळाली.
रणवीरबरोबर सूर जुळल्यानंतर निदान काही दिवस तरी दीपिकाने याबाबतीत मौन बाळगणेच पसंत केले होते. अगदी नामांकित पुरस्कार सोहळ्यातही तिने रणवीरच्या उत्साहाला शिस्तीने दटावत गप्प केले होते. मात्र, ‘राम-लीला’ चित्रपटाची ही जोडी आता पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी एकत्र आली आहे. आता तर त्या दोघांनीही प्रेमातली लुकाछुपी तात्पुरती का होईना थांबवलेली दिसते. कारण, दोघेही एकमेकांच्या सेटवर जाणे, परदेशात सुट्टी एकत्र घालवणे या गोष्टी उघडपणे करत असतात. ते दोघेही लवकरच विवाहाचा निर्णय घेणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. या सगळ्या उत्साही वातावरणात दीपिकामध्ये प्रचंड बदल जाणवत असल्याचे तिच्या मित्रमंडळींचे म्हणणे आहे.
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या सेटवर आलेल्या दीपिकाला कपिलने याच सेटवरचा अर्जुन आणि रणवीरचा व्हिडिओ दाखवला. ज्यात अर्जुनने रणवीरला चुंबन दिले होते. ते पाहिल्यानंतर दीपिकाने अर्जुनला उशी फेकून मारली. रणवीरचा व्हिडिओ दाखवल्यावरच मला प्रतिसाद मिळाला, असे अर्जुनने जाहीरपणे सांगितले. मात्र, त्यावर दीपिकाने कुठल्याही प्रकारे असमाधान व्यक्त केले नाही. उलट, तिने सेटवर धम्माल केली. दीपिका कपिलच्या सेटवर आधीही आली आहे. मात्र, तेव्हाची दीपिका आणि आत्ताची खुललेली दीपिका यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. रणवीरच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्याच्याबरोबर राहून दीपिकाही आपला मूळचा गंभीर स्वभाव हरवत चालली आहे, अशी प्रतिक्रिया बॉलीवूड वर्तुळात व्यक्त होत आहे.

Story img Loader