बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनं अलिकडेच एका इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटनंतर रणवीर सिंगवर सोशल मीडियावरून बरीच टीका करण्यात आली. एवढंच नाही तर त्याच्यावर बरेच मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. एकीकडे रणवीर सिंगला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटी मात्र रणवीर सिंगला पाठिंबा देताना दिसत आहेत. रणवीरच्या या फोटोशूवर आता अभिनेता अर्जुन कपूरने देखील कमेंट केली आहे.
रणवीर सिंगने ‘पेपर’ या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधून त्याने ७० च्या दशकातील पॉप आयकॉन ब्रुट रेनॉल्ड्स यांना ट्रिब्यूट दिला आहे. पण या फोटोशूटवरून रणवीरवर बरीच टीका झाली. पण अर्जुन कपूरला या फोटोशूटबद्दल विचारल्यानंतर त्यानं यावर प्रतिक्रिया दिली. ‘एक विलेन रिटर्न’च्या एका प्रमोशन त्याला रणवीरच्या फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचं उत्तर देताना अर्जुनने रणवीरला पाठिंबा दिला.
अर्जुन कपूर म्हणाला, “रणवीर नेहमीच जसा आहे तसाच सर्वांसमोर वागत आला आहे. जेव्हा तो कुठेही जातो तेव्हा त्याच्या आसपास एक वेगळीच एनर्जी असते. त्याच्यासोबत सर्वच एन्जॉय करतात. त्याला जे काही आवडतं ते तो करतो. आता त्याला हे (न्यूड फोटोशूट) चांगलं वाटलं तर त्याने ते केलं. ते करताना तो सहज आहे. मला वाटतं आपण सर्वांनीच त्याचा सन्मान करायला हवा. स्वतःचं एक मत असणं चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यावर होत असलेल्या टीकेबद्दल बोलायचं तर त्यांना एवढं महत्त्व द्यायला नकोच. लोक तर बोलणार, त्यांचं ते कामच आहे. पण तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायला हवं.”
आणखी वाचा- रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली “आपल्या देशात…”
अर्जुन कपूर पुढे म्हणाला, “रणवीर जे काही करत आहे त्यात तो आनंदी आहे आणि याचं सगळं श्रेय देखील त्यालाच जातं. जर त्याला यासाठी कोणीही जबरसदस्ती केलेली नाही आणि चुकीच्या पद्धतीने दाखवलेलंही नाही. त्यामुळे आपण याचा आदर करायला हवा. रणवीर जे काही करतोय त्या सर्व गोष्टींची त्याला परवानगी आहे. तो आनंदी राहू इच्छितो आणि या सर्व गोष्टी करून तो खूश आहे इतरांनाही खूश करत आहे.” दरम्यान न्यूड फोटोशूट करणारा रणवीर सिंग हा पहिलाच अभिनेता नाही. याआधीही बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्यांनी अशाप्रकारे न्यूड फोटोशूट केलं आहे.