बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ’83’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. रणवीर सिंहच्या 83 चित्रपटाला बॉलिवूडकरांसह चित्रपट समीक्षकांनी फार चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण टीमच्या अभिनयापासून ते दिग्दर्शक कबीर खानच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत निर्मात्यांसह संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे सचिनच्या या ट्विटवर रणवीर सिंहनेही प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतंच सचिन तेंडुलकरने कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सचिनने त्या चित्रपटाचे कौतुक करत त्याच्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट केले आहे. यावर तो म्हणाला, 83 मध्ये रणवीर सिंहचा एक छान सुंदर असा अष्टपैलू परफॉर्मन्स. खरोखरच कपिल देव यांच्या गुणांना मूर्त रूप देत आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या प्रतिष्ठित क्षणांची आठवण झाली. मला माहित आहे की, या विजयाने त्या लहान मुलाला खरोखर प्रेरणा दिली, असे त्याने म्हटले.
विशेष म्हणजे 83 या चित्रपटात सचिन तेंडुलकरचीही झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एक लहान मुलगा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा आनंद लुटताना दाखवण्यात आला आहे. कुरळ्या केसांचा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा क्रिकेटमधील प्रवास सर्वांनाच माहिती आहे. त्याचे देशासाठीही मोठे योगदान सर्वांना माहिती आहे.
खुशखबर! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’
दरम्यान सचिनने चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर रणवीरनेही त्याची ही कमेंट रिट्विट केली आहे. त्यावर रणवीर सिंह म्हणाला की, “…आणि मग तो लहान मुलगा पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिला. धन्यवाद, मास्टर! माझ्यासाठी याचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे.”
रणवीर सिंहच्या ‘83’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या चित्रपटाच्या यशाचं श्रेय रणवीरनं त्याच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांना दिलं. आहे. एकीकडे या चित्रपटासाठी दिग्दर्शक कबीर खानचं कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे रणवीर- दीपिकाच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात रणवीरनं भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.