‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादावरून जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा त्यातील कलाकरांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल झाली. पोस्टर, ट्रेलरमधून अभिनेत्री दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची झलक प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली असेल असंच म्हणावं लागेल. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रणवीरने. भूमिका कोणतीही असो, रणवीर नेहमीच त्यामध्ये स्वत:ला झोकून देतो. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘पद्मावती’साठी काम करणं सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणवीरने त्या अनुभवाविषयी सांगितले.
भन्साळी यांच्यासोबत त्याचा हा तिसरा चित्रपट आहे. भूमिकेविषयी समजावून सांगताना रणवीरला स्वत:चं कौशल्य दाखवण्यासाठी ते पुरेपूर स्वातंत्र्य द्यायचे. ‘अभिनेत्याकडून काय हवंय हे त्यांना नेमकं माहित होतं. अलाउद्दीन खिल्जी साकारण्यासाठी त्यांनीही दिग्दर्शनात बरीच मेहनत घेतली. अनेकदा ते आव्हानात्मक असायचं. काही गोष्टी जमत नव्हत्या तेव्हा सेट सोडून मी जायचो, रडायचो आणि पुन्हा सीन पूर्ण करण्यासाठी यायचो,’ असं रणवीरने सांगितलं.
वाचा : ‘अभिनेते अभिनेत्रींपेक्षा जास्त गॉसिप करतात’
‘रामलीला’मधील राम असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’मधील पेशवा बाजीराव, प्रत्येक भूमिका रणवीर जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भूमिकेला पडद्यावर तितक्याच जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न करतो. त्याची ही मेहनत चित्रपटांमध्ये स्पष्ट दिसून येते. ‘पद्मावती’ हा चित्रपट सध्या सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित होण्याच्या प्रतिक्षेत आहे. लवकरच प्रदर्शनाची तारीखसुद्धा निश्चित होईल. यामध्ये दीपिका राणी पद्मावतीची, शाहिद कपूर महारावल रतन सिंहची तर रणवीर अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे.