बॉलीवूडचा नायक म्हणून लोकप्रिय व्हायचं तर हरतऱ्हेच्या भूमिका केल्या तरी अ‍ॅक्शन भूमिकांमधून जोवर तो प्रेक्षकांची पसंती मिळवत नाही तोवर त्याला काही महत्त्व प्राप्त होत नाही. त्यामुळे सातत्याने वेगवेगळया अ‍ॅक्शन भूमिकांमधून आपण प्रेक्षकांसमोर कसे येऊ यासाठीची तारेवरची कसरत त्यांना करावीच लागते. सध्या अशी कसरत अभिनेता रणवीर सिंगची सुरू आहे. पुढच्या दोन वर्षांत तो महत्त्वाच्या अशा तीन वेगवेगळया अ‍ॅक्शन चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘पुरुष’ नाटकावर  वेब मालिका

रणवीर सिंगची भूमिका असलेला आणि बहुचर्चित चित्रपट म्हणजे रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’. या वेळी ‘सिंघम अगेन’साठी रोहित शेट्टीने मोठमोठाल्या कलाकारांची मोट बांधली आहे. अजय देवगण सिंघम म्हणून नायकाच्या भूमिकेत असला तरी या चित्रपटात रणवीर सिंगच्या सिम्बाचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी जवळपास ५० दिवस रणवीर चित्रीकरण करणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून एप्रिलपर्यंत ते पूर्ण होणार आहे. ‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण संपल्यानंतर रणवीर फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’च्या तयारीला लागणार आहे. बॉलीवूडमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘डॉन’ या चित्रपट मालिकेत तिसरा नायक म्हणून रणवीरचं पदार्पण होतं आहे. याआधी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान दोघांनीही ‘डॉन’ चित्रपट गाजवले. त्यामुळे साहजिकच रणवीरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाच्या लुक टेस्टपासून सगळी पूर्वतयारी रणवीरला करावी लागणार आहे. प्रत्यक्षात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला फरहान अख्तर ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येते. २०२५ मध्ये रणवीर त्याच्या तिसऱ्या अ‍ॅक्शन चित्रपटासाठी सज्ज असणार आहे. ‘मिन्नल मुरली’ या प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटाचा दिग्दर्शक बेसिल जोसफ याच्या ‘शक्तिमान’ या आगामी चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत असणार आहे. गेली तीन वर्षे या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची प्रक्रिया सुरू होती. आता ती पूर्ण झाली असून सोनी पिक्चर्स आणि साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh three action movie singham again don 3 and shaktimaan zws