संजय लीला भन्सालीच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात रणवीर सिंग महत्त्वाची भूमिका करतो आहे. या भूमिकेसाठी रणवीरने मराठी शिकायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकहाणीवर भन्साली यांनी या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली आहे. बाजीराव पेशवे ही भूमिका रणवीर करणार असून त्यासाठी त्याने अभ्यासाला सुरुवात केली आहे.
रणवीरच बाजीरावांची भूमिका करतो आहे. बाजीरावांचे मराठीपण ठळकपणे दिसणे गरजेचे आहे. त्यामुळेच रणवीरचे बोलणे, मराठी उच्चार, संवादफेक अधिक प्रभावी व्हावी यासाठी चित्रपटाचे संवादलेखक प्रकाश कपाडिया यांनी रणवीरला मराठीची खास शिकवणी लावली असल्याचे सांगण्यात येते. बाजीराव मस्तानीसाठी फार प्रखर तयारी सुरु आहे. मला मराठी शिकण्याची तसेच घोडा सवारी आणि अनेक गोष्टी भूमिकेसाठी शिकण्याची गरज आहे. मला डोक्यावरचे केसही काढावे लागणार असून माझ्या लूकवर आणि शरिरयष्टीवर अधिक काम करावे लागणार आहे, असे रणवीर म्हणाला.
‘बाजीराव मस्तानी’मध्ये प्रियांका चोप्राही महत्वाची भूमिका साकारणार आहे. दीपिका आणि प्रियांका या दोघीही सदर चित्रपटात असल्या तरी अद्याप मस्तानीची भूमिका कोण करणार यावर प्रश्न चिन्हच आहे.

Story img Loader