बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने बुधवारी इटलीत लग्नगाठ बांधली. इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी राजेशाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला. पारपंरिक कोंकणी पद्धतीने दीप- वीर विवाहबद्ध झाले आणि त्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. करण जोहर, कपिल शर्मा अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या सगळ्यांमध्ये कंडोमचा ब्रँड असलेल्या ‘ड्युरेक्स’ कंपनीने दीप-वीरला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ड्युरेक्स’ची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

रणवीर सिंग ‘ड्युरेक्स’चा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यामुळे ट्विटरद्वारे ‘ड्युरेक्स’ने रणवीर- दीपिकाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना आपल्या ब्रँडची जाहिरातही त्यांनी अतिशय हुशारीनं केली आहे. ‘ड्युरेक्स’ने याआधी विराट कोहली- अनुष्का शर्मा, सोनम कपूर- आनंद अहुजा या जोड्यांनादेखील अशाच हटके शुभेच्छा दिल्या होत्या. ‘अमूल’ या ब्रँडनेही रणवीर- दीपिकाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोंकणी पद्धतीनं लग्न पार पडल्यानंतर दीपिका रणवीर हे दोघंही पुन्हा एकदा सिंधी पद्धतीनं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आज पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यात नवरदेव रणवीर सी- प्लेनमधून ग्रँड फिल्मी एण्ट्री करणार असल्याची माहिती समोर येत आहे.