सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वी अटक झाली. या कारवाईनंतर तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. रान्या राव ही अनेकदा दुबईला ये-जा करीत असायची. त्यातूनच पोलिसांना संशय आला होता आणि डीआरआयने तिच्यावर कारवाई केली. या प्रकरणानंतर अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली.
या प्रकरणी रान्याचा पती जतीन हुक्केरीचीदेखील चौकशी केली गेली. त्या संदर्भात त्याने न्यायालयात अपील केले होते आणि अटकेपासून सूट मागितली होती. त्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करताना त्याने रान्या रावबरोबरचे त्याचे नाते नाममात्र आहे. कारण लग्नाच्या पुढच्याच महिन्यापासून रान्या त्याच्यापासून वेगळी राहत असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर आता त्याने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
जतीनने एक पत्रकार परिषद घेत, रान्यापासून घटस्फोट मिळविण्यासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, रान्या राव हिचा पती जतीन हुक्केरी म्हणाला, “लग्न केल्यापासून मला वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे. आज मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे”. सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणामुळे रान्याच्या पतीचीही चौकशी वाढली आहे.
जतीनने सुमारे चार महिन्यांपूर्वी रान्याशी लग्न केले. त्यानंतर ते बंगळुरूमध्ये एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या जतीनने बंगळुरूच्या आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाइनमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे. त्याने लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमधून डिसरप्टिव मार्केट इनोव्हेशनमध्ये स्पेशलायझेशनसह पुढील शिक्षण घेतले आहे.
रान्या राव कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. ४ मार्च रोजी दुबईहून परतताना बेंगळुरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्यासह तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. त्या छाप्यात २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. तेव्हा तिला अटक करण्यात आली.
दुबईला वारंवार भेटी देत असल्याने रान्या अधिकाऱ्यांच्या रडारवर होती. गेल्या वर्षी ती ३० वेळा आणि १५ दिवसांत चार वेळा दुबईला गेली होती, असे सांगण्यात येते. प्रत्येक वेळी ती सोने घेऊन येत असे. रान्याने कबूल केले आहे की, अटक होण्यापूर्वी तिने किमान दोन वेळा दुबईहून भारतात सोने आणले होते. दरम्यान, आतापर्यंत तिचा जामीन अर्ज तीन वेळा फेटाळण्यात आला आहे.