आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणारे ‘रॅप’साँग’ लवकरच मराठमोळ्या रंगात रंगलेले दिसून येणार आहे. पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेल्या या रॅपसॉंगचे  मराठीकरण करण्याचे काम गायक श्रेयस जाधव याने केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बघतोस काय मुजरा कर;’ या सिनेमाचे तरुण निर्माता असलेला श्रेयस एक चांगला रॅपर देखील आहे. मराठी अस्मिता आणि खास करून अस्सल पुणेकर असलेला श्रेयस लवकरच ‘आम्ही पुणेरी…’ हे रॅप गाताना दिसणार आहे. नुकत्याच या रॅपसाँगच्या टीजर आणि पोस्टरचे सोशल मिडीयावर अनावरण करण्यात आले. पुणेरी बाणा आणि खास शैली असणाऱ्या पुणेकरांसाठी हा रॅप मोठी पर्वणी ठरणार असून, मुंबईकरांसाठी देखील हे गाणे विशेष ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयसने यापूर्वी ऑनलाईन बिनलाईन’ सिनेमातील ‘ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये रॅप गायले होते. विशेष म्हणजे मराठी-हिंदी फ्युजन असलेल्या या गाण्याला आणि त्याच्या या रॅपला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला असल्या कारणामुळेच, एक संपूर्ण रॅप असलेलं गाणं ‘पुणे रॅप’च्या माध्यमातून श्रेयस लोकांसमोर घेऊन येत आहे. या गाण्याचे प्रत्येक बोल तरुणाईला भुरळ पाडणारे आहेत. हे गाणं पुण्याबद्दल असून यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच पण त्यासोबतच प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे.

कट्टर पुणेकर असणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. तसेच हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत यास लाभले आहे. एव्हरेस्ट इंटरटेंमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे हे पुणेरी रॅप मराठी संगीत क्षेत्राला महत्त्वाचे वळण देणारे ठरणार आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडेल, असा श्रेयसचा विश्वास आहे. शिवाय अजून काही रॅप गाणीदेखील या वर्षात काढणार असल्यामुळे हे नवीन वर्ष तरुणाईसाठी रॅपिंगची झिंग चढवणारे असेल, यात शंका नाही.\

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapper shreyas jadhav sung amhi puneri rap song