अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अनेकांचीच आवडती अभिनेत्री आहे. तिच्या चित्रपटांपासून ते तिच्या सुंदर आणि लोभस हास्यापर्यंत साऱ्याचीच रसिकांवर भुरळ पडली आहे. दीपिका पदुकोण आणि तिच्या चाहत्यांमध्येही एक वेगळेच नाते आहे. दीपिकाचे चाहते तिच्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळे करत आसतात. शक्य त्या मार्गाने चाहतेसुद्धा कलाकारांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसतात. या साऱ्यात सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे, सोशल मीडियाचा. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर असाच एक फोटो सध्या पोस्ट करण्यात आला आहे. गंमत म्हणजे हा फोटो दीपिका पदुकोणच्या शालेय जीवनातील आहे. त्यामुळे या फोटोमध्ये नेमकी दीपिका कोणती हे शोधण्यासाठी अनेकांना एक प्रकारची शोधमोहिम राबवावी लागत आहे.

इतक्या सर्व मुलींमध्ये नेमकी दीपिका कोण, हे सांगण्यात अनेकांना एका झटक्यात यश मिळत आहे. तर काहींना मात्र ही ‘मस्तानी’ इतक्या सहजासहजी सापडत नाहीये. हरकत नाही, खालून तिसऱ्या रांगेमध्ये डावीकडून पहिलीच उभी असलेली मुलगी दुसरी-तिसरी कोणीही नसून सर्वांचीच आवडती दीपिका आहे. शालेय जीवनातील दीपिकाचे हे रुप पाहून झालात ना थक्क? दीपिकाचा हा फोटो सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या फोटोत सहजासहजी न सापडणारी दीपिका सध्या मात्र तिच्या हॉलिवूड पदार्पणामध्ये व्यस्त आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेलसोबत ती ‘xxx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दुसरीकडे ती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांना पुन्हा एका ऐतिहासिक काळाची सफर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये राणी पद्मावतीची भूमिका साकारेल. तिच्यासोबत या चित्रपटात रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader