सध्या सर्वत्र ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये ‘आरआरआर’, ‘केजीएफ’ आणि अन्य दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत हा चित्रपट २०२२ मधला सर्वात यशस्वी चित्रपट बनला आहे. सामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीमधील कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. रिषभ शेट्टी यांनी लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता अशा तिहेरी भूमिका ताकदीने निभावल्या आहेत. रिषभ शेट्टी आणि ‘भारताची नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना यांचे खास कनेक्शन आहे.
तिने २०१६ साली रिषभ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये तिचा ‘गुडबाय’ हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, नीना गुप्ता यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसह काम करायची संधी तिला मिळाली. तगडी स्टारकास्ट, चांगला विषय असूनही तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या रश्मिका तिच्या आगामी चित्रपटांच्या कामांमध्ये व्यग्र आहे.
काही दिवसांपूर्वी रश्मिका बाहेरगावी जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. तेव्हा तिला एका पत्रकाराने “तू रिषभ शेट्टींचा कांतारा पाहिलास का?” असा सवाल केला. त्यावर रश्मिकाने “नाही. खूप दिवसांपासून मला कांतारा पाहायचा होता आणि मी लवकरच हा चित्रपट पाहणार आहे”, असे उत्तर दिले. या एका कारणामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने तिला “तुझ्या कारकीर्दीची सुरुवात ज्या कन्नड चित्रपटसृष्टीपासून झाली, तिथला सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहायला तुला वेळ कसा मिळाला नाही” असे म्हटले. तर दुसऱ्या यूजरने “तुला ज्या रिषभ शेट्टींनी लॉन्च केलं, त्यांचा चित्रपट अजूनही पाहिला नाहीयेस”, असे म्हणत तिला ट्रोल केले.
रश्मिका मंदाना सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. दररोज ती फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. बुधवारी तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोच्या माध्यमातून लोक तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे अशी माहिती चाहत्यांना दिली होती.