अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा असलेला ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सिता रामम्’ या सुपरहिट चित्रपटामध्ये तिने महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते.
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने २०१६ मध्ये ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत अनेक कन्नड, तेलुगू आणि तमिळ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता वाढली. तिने साकारलेल्या श्रीवल्ली या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. तिच्यावर चित्रीत झालेलं ‘सामी सामी’ हे गाणंदेखील तुफान गाजलं. एका मुलाखतीमध्ये रश्मिकाने ‘पुष्पा’ चित्रपटामुळे तिच्या आयुष्यामध्ये झालेल्या बदलांविषयीची माहिती दिली.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “माझ्या प्रवासाची सुरुवात ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाने झाली. ‘गीता गोविंदम’ चित्रपटामुळे लोक मला ओळखायला लागले. त्यानंतर आलेल्या ‘पुष्पा’मुळे माझे आयुष्य बदलले. या चित्रपटामुळे देशभरातील प्रेक्षकांचा माझ्याकडे एक अभिनेत्री म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. मी कधीही या क्षेत्रामध्ये काम करेन असा विचार केला नव्हता. आजही मी अभिनय करण्यासह स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे माझ्यासाठी सेलिब्रिटी ही संकल्पना फार नवीन आहे. ‘पुष्पा’ बनवताना आम्ही फक्त एक चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत होतो. चित्रपट इतका यशस्वी होईल असा विचार आमच्या मनात आला नव्हता”
‘गुडबाय’नंतर तिचे ‘मिशन मजनू’, ‘अॅनिमल’ असे चित्रपट हिंदी प्रदर्शित होणार आहेत. मिशन मजनूचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय पुष्पाच्या दुसऱ्या भागामध्येही ती दिसणार आहे.