‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील होय. या मालिकेत ‘शनाया’ या भूमिकेत ती दिसली होती. खलनायिकेच्या पात्रात तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ती आपल्या सहज अभिनयासाठी ओळखली जाते. आता मात्र तिने एका मुलाखतीदरम्यान लग्नाविषयी वक्तव्य केल्याने अभिनेत्री चर्चेत आली आहे.
रसिका सुनिलचे लग्नासंबंधी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर भाष्य
अभिनेत्री रसिका सुनीलने ‘प्लॅनेट मराठी’ या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी तिने करिअर ऐन भरात असताना लग्न का केलंस असं पुरुष कलाकाराला विचारलं जात नाही, मग आम्हाला म्हणजेच स्त्री कलाकारांना हा प्रश्न का विचारला जातो? अशी खंत बोलून दाखवली आहे. ती म्हणते, “करिअर आणि लग्न ही दोन्ही वेगळी पारडी आहेत आणि मग लग्न केलं तर करिअर खाली जातंय की काय किंवा करिअर वर येतंय तर मग लग्न करू नको की काय, ही तुलनाच मुळात चुकीची आहे. आपण कुठल्याही पुरुषाला विचारत नाही की, तू करिअर चांगलं सुरू असताना का लग्न केलं? आपण त्यांचं लग्न साजरं करतो, मग त्याच पद्धतीने आमच्या बाबतीत विचार का केला जात नाही”, असे तिने म्हटले आहे.
याबरोबरच प्रसिद्धीच्या टोकावर असताना मालिकेतून बाहेर पडत फिल्म मेकिंगच्या प्रशिक्षणासाठी तुझ्या परदेशात जाण्याच्या निर्णयाचा तुला कधी त्रास झाला का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने म्हटले की, शनायाच्या भूमिकेतून मी घराघरात पोहचले होते, मला खूप प्रसिद्धी मिळत होती. मात्र, मालिकेतून बाहेर पडत शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतला होता, त्यामुळे मला त्या निर्णयाचा त्रास झाला नाही. तुम्हाला जर कोणत्याही सवयीच्या वातावरणातून बाहेर निघायचे असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला शोधावा लागतो, त्यासाठी निर्णायक पाऊले उचलावी लागतात. तो आत्तापर्यंतचा माझा धाडसी निर्णय असल्याचे तिने म्हटले आहे.
हेही वाचा: आमचं ‘या’ गोष्टीवरून होतं भांडण, करिना कपूर खानने केला सैफ अली खानबरोबरच्या वादावर खुलासा
रसिका नुकतीच ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट १९ तारखेला प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच ती लवकरच ‘काटाकिर्र’ या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचे रसिकाने म्हटले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd