‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. रसिका ही लवकरच ‘फकाट’ हा चित्रपटात झळकणार आहे. याबरोबरच रसिका बऱ्याच काळानंतर एका व्यावसायिक नाटकातही दिसणार आहे.
‘Diet लग्न’ या नव्या नाटकातून रसिका पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहे. याच नाटकाच्या प्रमोशनमध्ये सध्या रसिका व्यस्त आहे. दरम्यान, नुकतंच तिने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या नाटकाबद्दल आणि एकूणच तिच्या मनोरंजन क्षेत्रातील अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये रसिकाला तिच्या बोल्डनेसबद्दल आणि इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोजबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : कोणत्या अभिनेत्याला शर्टलेस बघायला आवडेल? अमृता रावने दिलेलं मजेशीर उत्तर, म्हणाली…
या प्रश्नावर रसिकाने चोख उत्तर दिलं आणि बोल्डनेस हा समोरच्या व्यक्तीच्या नजरेवर अवलंबून असतो, असंही तिने भाष्य केलं. रसिका म्हणाली, “मला असं वाटतं की माझे विचार हे अधिक बोल्ड आहेत. इतरांच्या आयुष्याबद्दल किंवा घडामोडींबद्दल मी भाष्य करत नाही किंवा त्यात लुडबुड तर अजिबात करत नाही. कपड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोल्डनेस हा पाहणाऱ्या व्यक्तीच्या नजरेवर अवलंबून असतो. कपड्यांनी बोल्ड असणं हा मुद्दा मला न पटणाराच आहे.”
याबरोबरच रसिकाला साडी परिधान करायला प्रचंड आवडते, असंही ती या मुलाखतीमध्ये म्हणाली. रसिका म्हणाली, “खासकरून लग्नानंतर मला साडी हा पेहराव प्रचंड आवडला, आणि साडी नेसण्यातही वेगळीच मजा आहे.” रसिका सुनील आणि सिद्धार्थ बोडके यांची मुख्य भूमिका असलेलं ‘Diet लग्न’ हे नाटक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलं आहे. ९ जून रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये रंगणार आहे.