‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका प्रसिद्धीझोतात असताना ‘शेवंता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांसह चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान ही मालिका सोडताना अपूर्वाने मालिकेतील सहकलाकारांसह दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहे. नुकतंच या आरोपांवर मालिकेच्या दिग्दर्शकांनी प्रत्युत्तर दिले आहे.
छोट्या पडद्यावरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेच्या तिन्ही भागांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र त्यातच अपूर्वाने ही मालिका सोडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. यावर नुकतंच मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : अभिनेत्री शुभांगी गोखले याचं फेसबुक अकाऊंट हॅक, ‘त्या’ लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन
‘लोकमत’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे चित्रीकरण सावंतवाडीजवळील आकेरी गावाजवळ सुरु आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत म्हणाले, “रात्रीस खेळ चाले या मालिकेने आम्हा कलाकारांना एक कुटुंब मिळवून दिले आहे. शेवंताची भूमिका करणारी अपूर्वा नेमळेकर ही काही दिवसांपूर्वी या मालिकेमधून बाहेर पडली,” असे ते म्हणाले.
“मात्र ती बाहेर पडल्यानंतर आम्ही या भूमिकेसाठी तिच्या तोडीस तोड असणाऱ्या एका नव्या कलाकाराची निवड केली आहे. ज्याप्रकारे अपूर्वा ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती, तशीच ती सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल,” असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरातून ‘दादूस’ची एक्झिट, सुरक्षित स्पर्धकांची नावे समोर
दरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ च्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वाने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात ‘शेवंता’ हे पात्र सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरले होते. मात्र आता अपूर्वाने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळसकर ही ‘शेवतां’ची भूमिका साकारताना दिसत आहे.