आपले केस लांब, काळेभोर आणि घनदाट असावेत असं सर्वच स्त्रियांना वाटतं. मात्र सध्याचं प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे केस खराब होतात. मग ते चांगले होण्यासाठी कधी वेगवेगळी तेलं वापरली जातात तर कधी बाजारात मिळणारे शाम्पू आणि कंडिशनरचा वापर होतो. मात्र ही महागडी प्रसाधनं वापरुनही म्हणावा तितका उपयोग होत नाही. मग केस चांगले होण्यासाठी नेमके काय करावं ते आपल्याला कळत नाही. असे विविध उपाय करुन वैतागलेल्या स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी अभिनेत्री रविना टंडन पुढे सरसावली आहे. तिने केसांना सुंदर करण्यासाठी एक घरगुती उपाय सुचवला आहे.
रविनाने एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून केसांचा पोत सुधारण्यासाठी एक घरगुती उपाय सुचवला आहे. “केसांची निगा राखण्यासाठी आवळ्याचा वापर करा. सहा आवळ्यांना दुधामध्ये टाकून गरम करा. त्यानंतर आवळ्याच्या बिया काढून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला केसांच्या मुळामध्ये लावून चांगलं मसाज करा. १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.” असा उपाय रविनाने सुचवला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
केसांची काळजी कशी घ्याल? – डॉ.रिंकी कपूर द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ
१. शक्यतो हेअर स्टाइल, हेअर स्प्रे यांचा वापर टाळावा.
२. केसांना रंग देणे. हायलाइट्स करणं, केसांवर निरनिराळ्या ट्रिटमेंट करणं बंद करावं.
३. केसांकरिता नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा.
४. गर्भधारणेदरम्यान किंवा नंतरच्या काळात मिनोऑक्सिडिल हेअर ट्रीटमेंटचा वापर करु नये.
५. केस रंगविण्याकरिता रसायनांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा पर्याय निवडा.
६. केसांची निगा राखण्यासाठी संतुलित आहार घ्या. तसेच योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
७. ओले केस विंचरू नका.
८. केस घट्ट बांधू नका.
९. केसांची स्वच्छता राखा.
१०. केसांच्या समस्या टाळण्यासाठी घरगुती उपाय.