अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. आताही असंच काहीसं घडलंय. रवीनानं ९० च्या दशकात तिच्या मुली छाया आणि पूजा यांना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी रवीना फक्त २१ वर्षांची होती. रवीनानं त्यावेळी मुलींना दत्तक घेतल्याचं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. यावर नुकतीच एका मुलाखतीत तिने प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत ही गोष्ट त्यावेळी सर्वांपासून लपवून ठेवण्याचं कारणही तिनं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरजे सिद्धार्थ कननशी बोलताना रवीनानं मुलींना दत्तक घेण्याच्या तिच्या निर्णयावर भाष्य केलं. ४६ वर्षीय रवीना दोन मुलींची आई आहे आणि तिनं या मुलींना वयाच्या २१ व्या वर्षीच गुपचूप दत्तक घेतलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रवीनानं असं करण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

रवीना म्हणाली, ‘सुरुवातीला हा टॅब्लॉइड आणि यलो जर्नालिझमचा काळ होता. त्यावेळी खट्टर म्हणून एक लेखक होते ते बरंच वाईट गोष्टी लिहत असत. त्यांच्या हेडलाइनही वाईट असायच्या. ते असे दिवस होते ज्यावेळी कोणत्याही गोष्टीचं स्कॅन्डल झालं असतं. जेव्हा मी मुलींना दत्तक घेतलं, त्यावेळी मी नेहमीच याबद्दल बोलणं टाळलं. एवढंच नाही तर माझ्या मुलींना माझ्यासोबत शूटिंगसाठी येण्याची परवानगी देखील नव्हती. पण नंतर जेव्हा त्या माझ्यासोबत सगळीकडे येऊ लागल्या तेव्हा सर्वांनी याबद्दल बोलायला सुरुवात केली. या मुली कोण आहेत असा प्रश्न सर्वजण विचारायचे. तेव्हा मी याबद्दल बोलू लागले.’

रवीना पुढे म्हणाली, ‘त्यावेळी मला भीती वाटत असे. मी जर याबाबत बोलले तर लोक काय विचार करतील? मासिकांमध्ये मी या मुलींना सीक्रेटली जन्म दिलाय, असं लिहिलं जाईल. या मुलींच्या वडिलांबद्दल विचारलं जाईल, असे सर्व विचार त्यावेळी माझ्या डोक्यात सुरू असायचे. त्यावेळी लोकांचे विचार खूपच वाईट होते. त्यामुळे मी मुलींना दत्तक घेतलं आहे ही गोष्टी सर्वांपासून बराच काळ लपवून ठेवली होती.’

दरम्यान रवीनाची मोठी मुलगी छाया हिचं लग्न झालं असून तिला एक गोंडस मुलगा देखील आहे. अलिकडे छायाच्या लग्नाचा वाढदिवशी रवीनानं तिच्या लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. एका मुलाखतीत आपल्या मुलींबद्दल बोलताना रवीनानं, ‘त्या दोघीही माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत’ असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon open up about why she has adopted her daughter quietly mrj