बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीनाला फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यासाठी ओळखले जाते. नुकतंच रवीना टंडनने तिच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी ती म्हणाली की, एकेकाळी माझे नाव हे एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या टॅब्लॉईडच्या गॉसिप कॉलममध्ये असायचे. एकदा तर त्यात मी माझ्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.

नुकतंच रवीनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी रवीना म्हणाली की, “मी माझ्या सहकलाकारांना नेहमीच माझे मित्र मानले आहे. मात्र हे सत्य मासिकांचे संपादक स्विकारु शकले नाही आणि त्यामुळे माझे नाव अनेकांसोबत जोडले जायचे. या त्यावेळीच्या गोष्टी आहेत, जेव्हा आम्ही बॉलिवूड कलाकार पत्रकारांच्या दयेवर जगत होतो.”

“मला आजही ते दिवस आठवतात, जेव्हा अनेक रात्री मला झोप येत नव्हती. मी नेहमी झोपायला जातेवेळी रडायची. मला दर महिन्याला एक भीती असायची की एखादा पिवळ्या रंगाचा गॉसिप कॉलम माझ्या प्रतिष्ठेला कलंकित करेल. तो मला, माझी विश्वासार्हता, माझी प्रतिष्ठा, माझ्या आईवडिलांचा आदर या सर्वांचे तुकडे तुकडे करुन टाकेल आणि त्यावेळी मला हे सर्व काय आहे हे वाचून आश्चर्य वाटायचे,” असेही रवीना म्हणाली.

‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ काँग्रेस नेत्याच्या मुलाने अभिनेत्री अमिषा पटेलला केलं उघडपणे प्रपोज, स्पष्टीकरण देताना म्हणाली…

यापुढे रवीनाने सांगितले की, “एकदा माझे नाव माझ्या भावाशीही जोडले गेले होते. अनेक वृत्तपत्रांनी लिहिले होते की, रवीनाला एक सुंदर आणि गोरा मुलगा सोडायला येतो. आम्ही रवीना टंडनचा बॉयफ्रेंड शोधला आहे. आम्ही कलाकार कोणाकोणाला आणि किती लोकांना समजवून सांगणार होतो? त्यावेळी आम्ही एखाद्या थांबून हॅलो म्हटले तरीही ते चुकीचे असायचे.”

रवीनाने १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अंदाज अपना अपना, खिलाडी का खिलाडी, बडे मियाँ छोटे मियाँ, शूल आणि अक्स यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये तिने काम केले. ‘दमन’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सध्या रवीना ही तिच्या आगामी ‘आरण्यक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.