‘टाइमपास’च्या यशाची चर्चा बॉलिवूडमध्येही होऊ लागली असून दिग्दर्शक रवी जाधव यांना आता ‘बॉलिवूड’ खुणावू लागले आहे. रवी जाधव यांनी आता ‘बॉलिवूड’च्या ‘शंभर कोटी क्लब’मध्ये सहभागी व्हावे, असे जाहीर आवतण हिंदीत ‘गदर’, ‘ओ माय गॉड’, ‘गुलाल’ या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन’कडून बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमात देण्यात आले.
‘टाइमपास’च्या व्यावसायिक यशाबद्दल मुंबईत अंधेरी येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन केणी यांनी जाधव यांना बॉलिवूडमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना केणी म्हणाले की, मराठी चित्रपट प्रामुख्याने महाराष्ट्रापुरता मर्यादित राहतो. तो हिंदी चित्रपटाप्रमाणे संपूर्ण देशभरात पोहोचत नाही. तरीही ‘टाइमपास’ने आजवर ३० कोटींहून अधिक महसूल जमा केला आहे. मराठीतील हे ३० कोटी म्हणजे हिंदीतील एका चित्रपटाच्या १०० कोटी रुपयांच्या बरोबरीचे आहेत. त्यामुळे जाधव यांनी आता आमच्या एस्सेल व्हिजनचा किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या चित्रपट स्वीकारावा आणि हिंदीतही आपली चुणूक दाखवावी.
अर्थात जाधव हे हिंदीत कधी आणि कोणत्या संस्थेच्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतील हे आपल्याला माहिती नाही, अशी पुस्ती जोडून केणी यांनी सांगितले की, ८ फेब्रुवारीला होणाऱ्या ‘झी सिने’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘टाइमपास’ची विशेष बाब म्हणून दखल घेण्यात यावी, अशी सूचनाही आपण संबंधितांना केली आहे.
रवी जाधव लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करत असून कदाचित ‘झी सिने’ पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Story img Loader