कुख्यात रवी पुजारी टोळीने निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांना तीन वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी कबुली गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. भट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सोमवारी गुन्हे शाखेने रवी पुजारी टोळीच्या १३ गुंडांना अटक केली आहे. या प्रकारानंतर भट कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
पुजारी टोळीचे काही गुंड शनिवारी खार येथे निर्माते महेश भट यांच्यावर हल्ला करण्यासाठी येणार असल्याची माहिती मोटार वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून सात गुंडांना ताब्यात घेतले. त्यानंतर एकूण १३ गुंडांना अटक करण्यात आली. या गुंडांच्या चौकशीत या कटाची आणखी माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी हा कट रचला होता. या काळात गुंडांनी महेश भट्ट यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती आणि तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना संधी मिळाली नव्हती. महेश भट, त्याचे बंधू मुकेश भट आणि मुलगा राहुल भट या तिघांपैकी एकावर प्राणघातक हल्ला करण्याच्या सूचना रवी पुजारीने दिल्या होत्या. इशरत शेख आणि मोहम्मद अनिस र्मचट हे गुंड यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. अटक केलेल्या गुंडांमध्ये निर्माते अली मोरानी यांच्या बंगल्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांचाही समावेश आहे.