तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता रवी तेजा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. रवी तेजाने आजवर कित्येक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा रवी ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला,

सध्या रवी तेजा त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मुंबईत आला आहे. नुकतंच त्याने ‘झूम एंटरटेनमेंट’ला यासंदर्भात एक मुलाखत दिली ज्यामुळे तो आणखी चर्चेत आला आहे. या मुलाखतीमध्ये रवी तेजासह चित्रपटातील अभिनेत्री व क्रीती सेनॉनची बहीण नूपुर सेनॉन व जिशु सेनगुप्ता यांनीही हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये या तिघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आणखी वाचा : ‘कुली’शिवाय ‘या’ चित्रपटाच्या सेटवरही मृत्यूच्या दाढेतून परतले होते बिग बी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

या मुलाखतीदरम्यान कोणत्या अभिनेत्याकडून काय चोरी करायला आवडेल असा एक गंमतीशीर प्रश्न रवी तेजाला विचारण्यात आला व राम चरण, प्रभाससारख्या कलाकारांचा उल्लेख झाला. याचं उत्तर देताना रवीने राम चरण कडून ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी लागणारं कौशल्य व प्रभासकडून त्याचा औरा चोरण्याची इच्छा व्यक्त केली. अर्थात हे सगळं मस्करीत सुरू होतं. यावेळी जेव्हा कन्नड स्टार यशचं नाव समोर आलं तेव्हा रवी तेजाने दिलेलं उत्तर यशच्या चाहत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे.

यशविषयी बोलताना रवी तेजा म्हणाला, “मी यशचा फक्त एकच चित्रपट पाहिला आहे, आणि तो फार नशीबवान आहे की त्याला ‘केजीएफ’सारख्या चित्रपटात काम करायची संधी मिळाली.” रवी तेजाच्या या वाक्यामुळे यशचे चाहते चांगलेच नाराज झाले असून सोशल मीडियावर त्यांनी रवी तेजाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यश हा खूप जुना अभिनेता असल्याने रवी तेजाचं ही वक्तव्य बऱ्याच लोकांना खटकलं आहे. रवी तेजाचा ‘टायगर नागेश्वर राव’ हा चित्रपट २० ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader