रवींद्र पाथरे

माणसं प्राप्त परिस्थितीत्यांची स्वत:ची उपजत ऊर्मी आणि भवताल यांच्यातून घडत वा बिघडत असतात. त्यातून त्यांना बाहेर काढणं अवघडच असतं. अशा अनेकांची आयुष्यं कळत-नकळत धारेला लागलेली आपण पाहत असतो. परंतु आपण त्यांच्याबाबतीत काही करू शकत नाही. त्यांना या गोष्टींची जाणीव करून दिली तरी ती स्वीकारणं- न स्वीकारणं त्यांच्याच हाती असतं. या सगळ्याचा अपरिहार्य शेवट कधी कधी प्रलयंकारी असू शकतो. शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘नकळत सारे घडले’ हे नाटक याचं वानगीदाखल उदाहरण ठरायला हरकत नाही. फार वर्षांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. तेव्हाही ते आशय-विषयानं गाजलं होतं. आता नव्यानं रंगभूमीवर येताना त्यातला दृष्टिकोन थोडा बदलल्यानं ते अधिक कालसुसंगत, अधिक परिणामकारक झालं आहे. त्यातल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनावर यावेळी अधिक भर दिलेला आहे; जे या नाटकाचं वैशिष्ट्य ठरत आहे.

timothy hyman ra biography artist timothy hyman career journey
व्यक्तिवेध : टिमथी हायमन
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Vijay Tapas Drama Ruiya College Marathi Poetry
व्यक्तिवेध: विजय तापस
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
Loksatta kutuhal Advantages and Disadvantages of the Future Humanoid
कुतूहल: भविष्यातील ह्यूमनॉइडचे फायदे आणि तोटे

आई-वडील दुबईत असणारा राहुल इथे मुंबईत आपल्या बटूमामाबरोबर राहत असतो. बटूमामा अगदी कडक, नको इतका स्पष्टवक्ता, नाकासमोर चालणारा गृहस्थ. तो अविवाहित असतो. राहुल या आपल्या मामाच्या प्रचंड धाकात असतो. त्याला खरं तर कॉलेजमध्ये नाटक वगैरे इतर उपक्रमांत, मित्रमैत्रिणींमध्ये टाईमपास करण्यात जास्त रस असतो. पण मामाच्या कडक शिस्तीमुळे त्याची घुसमट होत असते. त्यामुळे तो त्याविरुद्ध अधूनमधून बंडही करत असतो. त्याने धडपणे शिक्षण पुरं करावं, आयुष्यात मार्गी लागावं आणि मग हवं ते करावं अशी बटूमामाची इच्छा असते.

हेही वाचा >>> “सार्वजनिक गणपती करू नये”, शुभांगी गोखलेंचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “दारू पिऊन पत्ते खेळणं…”

अशात एकदा राहुलची एकांकिका नंबरात येते आणि त्याला अभिनयाचा पुरस्कार मिळतो; तोही त्याची आवडती अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते. ती त्याचं तोंड भरून कौतुक करते. आणि तिच्या या प्रशंसेनं हुरळून त्याला आपण सिनेमात स्टार बनण्यासाठीच जन्माला आलो आहोत असा साक्षात्कार होतो. तो करिश्माचा नंबर मिळवून तिला सतत फोन करू लागतो. पण त्याचा फोन तिच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही. एव्हाना त्याचं सगळं वागणं-बोलणंच बदललेलं असतं. तो स्वत:ला बॉलीवूडमधील भावी स्टार समजू लागतो. त्याचं वास्तवाचं भान सुटतं. तो भलत्याच काल्पनिक जगात वावरू लागतो. त्याच्या या हवेत तरंगण्याच्या वृत्तीचा गैरफायदा कुणी कुणी घेऊ लागतात. त्याची जवळची मैत्रीण मोनिका त्याला वास्तवाची जाणीव करून देऊ पाहते. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं तिला जाणवतं. ती मानसोपचारतज्ज्ञ मीराऑण्टीला राहुलवर उपचारासाठी पाचारण करते. तेव्हा मीराच्या लक्षात येतं की, बटूमामाच्या कडक वागण्या-बोलण्यापायीच राहुलवर हा असा विपरीत परिणाम झालाय. ती त्यांना राहुलशी थोडं मऊ वागावं म्हणून सुचवते. पण आता आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होणं शक्य नाही, हे ते मीराला स्पष्टपणे सांगतात. राहुलचं वास्तवाचं सुटलेलं भान मीराला जाणवतं आणि ती समुपदेशनाद्वारे त्याला ताळ्यावर आणायचा (आपल्या परीनं) प्रयत्न करते. पण ते फळास येताना मात्र दिसत नाही. ती बटूमामाला त्याबद्दल दोष देते. राहुलबरोबर त्यांनाही समुपदेशनाची गरज आहे हे तिच्या लक्षात येतं. ती तसं बटूमामांना सांगते. तेही तिला सहकार्य करण्याचं आश्वासन देतात. पण बटूमामांचा भूतकाळ जेव्हा तिला समजतो तेव्हा या एकूण प्रकारणाबद्दलचं आपलं आकलनही चुकलंय, चुकतंय याची तिला स्पष्ट जाणीव होते. राहुललाही बटूमामाच्या तडकभडक वागण्या-बोलण्यामागचं कारण, परिस्थिती समजते. आपल्या वागण्या-कृतीतील दोष त्याला कळून येतात. बटूमामालाही आपल्या चुका लक्षात येतात. आणि मानसोपचारतज्ज्ञाने प्रत्येक केसचा सांगोपांग, सर्वांगीण विचार करणं कसं गरजेचं आहे हे मीरालाही नकळत कळतं.

लेखक शेखर ढवळीकर यांनी ही मनोविकाराची केस अत्यंत नाट्यपूर्णतेनं यात मांडली आहे. व्यक्ती, त्यांचं घडणं/ बिघडणं, उक्ती आणि कृती, त्यातून निर्माण होणाऱ्या विकृती यांचा उत्तरोत्तर रंगणारा खेळ त्यांनी नाटकात रंगतदारपणे रचलाय. मोनिकाचा अपवाद करता यातलं प्रत्येक पात्र त्यांनी ठसठशीतपणे उभं केलं आहे. त्यांच्यातले परस्पर संवाद, विसंवाद त्यांनी धारदारपणे मांडलेत. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हा मानसशास्त्रीय खेळ तितक्याच कौशल्यानं हाताळलाय. यातील मानसशास्त्रीय दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी उन्मेखून अधोरेखित केलं आहे. पात्रनिवडीतही त्यांनी अर्धीअधिक बाजी मारलीय. आजवर विनोदी अभिनेते म्हणून शिक्का बसलेल्या आनंद इंगळे यांना एका खडूस, फाटक्या तोंडाच्या, अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तीच्या रूपात पेश करण्याचं आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या स्वीकारलंय. डॉ. श्वेता पेंडसे यांना मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत विश्वासार्ह बनवण्यात त्यांचा सहज वावर, हालचाली, हावभाव यांचा मोठा वाटा आहे. राहुलचं सुटलेलं वास्तवाचं भान त्याच्या उक्ती-कृतीतून त्यांनी लीलया दाखवलंय. समुपदेशनाचं अवडंबर न माजवता अपेक्षित परिणाम साधण्याचं काम यात दिग्दर्शकानं सफाईनं केलंय. मनोविकारातील या पैलूवर भर देण्यानं नाटकाचा कोनच बदललाय. तो अत्यंत परिणामकारक झालाय.

राजन भिसे यांनी बटूमामाचं मोकळंढाकळं घर वास्तवदर्शीत्वानं उभारलंय. अशोक पत्की यांनी संगीतातून नाट्यात्मक प्रसंग ठाशीव होतील याची काळजी घेतली आहे. तीच गोष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांची. नाटकातले मूड्स त्यांनी ठळक केलेत. मंगल केंकरे यांनी वेशभूषेतून पात्रांना त्यांचं बाह्य व्यक्तिमत्त्व बहाल केलं आहे. आनंद इंगळे यांनी बटूमामांची खाष्ट, पण अंतर्यामी प्रेमळ असलेल्या राहुलच्या मामाची भूमिका आवश्यक तो आब राखून केली आहे. त्यांचं कोकणस्थी आस्तिक्य, कोकणाबद्दलचं प्रेम, राहुलची कडक निगराणी याबद्दलचे तपशील त्यांनी बोलण्या-वागण्यातून ठासून व्यक्त केले आहेत. त्यांचा प्रतिकूल भूतकाळ कथन करतानाही ते फारसे भावनावश होत नाहीत. लगेचच स्वत:वर नियंत्रण मिळवतात. बटूमामा त्यांनी जणू सजीव केला आहे.

डॉ. श्वेता पेंडसे यांनी मानसोपचारतज्ज्ञ मीराची भूमिका अत्यंत सहजतेनं साकारली आहे. त्यांचा सहजत्स्फूर्त, मनमोकळा संवाद, त्यातून समोरच्याकडून आपल्याला पाहिजे ते काढून घेण्याची पद्धत, बटूमामांबद्दलचं त्यांचं चुकलेलं निदान नम्रपणे स्वीकारणं… हे अगदी सहजगत्या त्यांच्याकडून घडतं. कुठलीही पोझ त्यात आढळत नाही. त्यांचा प्रसन्न वावर मानसोपचारतज्ज्ञ म्हणून एक विश्वास प्राप्त करतो. राहुल झालेल्या प्रशांत केणी यांनी त्याचं सुटलेलं वास्तवाचं भान, त्यातून आलेला बेफिकीरपणा, झालेली कोंडी आणि त्यातून बाहेर पडण्याचा न दिसणारा मार्ग… हे सगळं उत्कटतेनं व्यक्त केलंय. त्यांच्या देहबोलीतूनही ते पुरेपूर दिसतं… जाणवतं. तनिषा वर्दे यांना मोनिकाच्या भूमिकेत संहितेचं कसलंही पाठबळ मिळालेलं नाही. तरीही त्या आपलं काम चोख करतात.

एकुणात, एक अप्रतिम नाटक पाहिल्याचं समाधान ‘नकळत सारे घडले’ प्रेक्षकांना देतं यात शंका नाही.