महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील एका गावात एखाद्याचे निधन झाल्यानंतर पाळली जाणारी विशिष्ट प्रथा. त्या प्रथेचा संदर्भ म्हणून वापर करत आजही खेडोपाडय़ात प्रचलित असलेल्या अनेक अंधश्रद्धा आणि त्यामागचं मूळ म्हणजे शिक्षणाचा अभाव.. या दोन्ही बाजूंना जोडणारी कथा घेऊन दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी ‘पल्याड’ हा चित्रपट केला आहे. या चित्रपटाची फोर्ब्स या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकानेही दखल घेतली आहे आणि नुकतीच या चित्रपटाची गोव्यात होणाऱ्या ‘इफ्फी’ महोत्सवासाठीही निवड करण्यात आली आहे. मराठी चित्रपट राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मानसन्मान मिळवतात, मात्र आपल्या मायभूमीत म्हणजे महाराष्ट्रात अशा वास्तववादी विषय मांडणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीत. त्याउलट ‘चांदोबा’सारख्या गोड गोड कथा देणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांची भलामण केली जाते, याबद्दल नापसंती व्यक्त करतानाच मराठीत वास्तववादी चित्रपट नकोतच का?, असा सवाल ‘पल्याड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता शशांक शेंडे यांनी व्यक्त केला.
‘पल्याड’ची कथासंकल्पना ही वास्तववादी घटनेवरून बेतलेली आहे. नागपुरात चंद्रपूरसारख्या भागातून आलेले दिग्दर्शक शैलैश भीमराव दुपारे यांनी या चित्रपटाचे सहलेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आणि त्यांनीच चंद्रपुरातील व्यावसायिक आणि निर्माते पवन आणि सूरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ यांच्याबरोबर मिळून केली आहे. गावात कोणाचा मृत्यू झाल्यानंतर रात्री पुजाऱ्याकडून त्याची पूजा करून घ्यायची ही प्रथा, या वेळी मुक्ती देईन असे म्हटले जाते. या प्रथेमागचे मूळ शोधत शिक्षणाची गरज या मुद्दयापर्यंत येऊन पोहोचलेली कथा म्हणजे ‘पल्याड’. हा चित्रपट सध्या विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून दाखवला गेला, आता इफ्फीनेही त्याची दखल घेतली आहे. ४ नोव्हेंबरला चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पण खरोखरच मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिल का? हा प्रश्न आम्हा कलाकारांनाही असतो, असं शशांक शेंडे सांगतात. ‘तान्हाजी’सारखा हिंदी चित्रपट, वेबमालिका, मराठी चित्रपटातून विविध भूमिका करणारे शशांक शेंडे ‘पल्याड’मध्येही एका वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहेत. एक कलाकार म्हणून तुम्ही सातत्याने काम करत राहिलं की चार वर्षांनी अशी एखादी चांगली पटकथा वाटय़ाला येते. अशी कथा ज्यात त्या कलाकाराला खरंच स्वत:हून काही करावंसं वाटतं, असं ते सांगतात. मात्र त्यांचं हे काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंच असं नाही. ‘उदाहरणच द्यायचं झालं तर ‘पल्याड’ प्रदर्शित होत असेल आणि त्याच वेळी शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होणार असेल तर प्रेक्षक साहजिक शाहरुखच्या चित्रपटाला पसंती देतात. ते तेव्हा असं म्हणत नाहीत की अरे मी मराठी आहे. हिंदीपेक्षा मी माझ्या भाषेतला चित्रपट पहिल्यांदा पाहीन. ते हिंदीला प्राधान्य देतात. मग त्या वेळी मराठी अस्मिता वगैरे मुद्दे आठवतच नाहीत. साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दोन लाख लोकसुद्धा मराठी चित्रपट पाहायला येत नाहीत ही खूप शरमेची बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
एक कलाकार म्हणून ते सातत्याने आशयपूर्ण भूमिका आणि चित्रपट करत आले आहेत. पण हे असं जाणीवपूर्वक करत नसल्याचं ते सांगतात, ‘एखादं कथाबीज माझ्यासमोर हळूहळू पटकथेच्या प्रक्रियेतून जात पूर्णत्वाला येत असेल तर माझं योगदान अशा चित्रपटात शंभर टक्के असतं. त्याचं कारण माझ्यासमोर ती कथा आकार घेत असताना मी अनुभवतो. अभिनेता म्हणून आजवरचा जो कामाचा अनुभव आहे त्यावरून आपण पहिल्यांदा जे पाहतो त्याचाच प्रभाव खरा असतो किंवा शेवटपर्यंत राहतो हे मी खात्रीने सांगतो. आणि एक कलाकार म्हणून जेव्हा आपण एखादं दृश्य करत असतो तेव्हा जर ते करतानाच कंटाळा येत असेल, तर पडद्यावर कुठेतरी प्रेक्षकांनाही तो भाग कंटाळवाणा किंवा निरस वाटतो हे चित्रपट पाहताना आपल्याला ठळकपणे लक्षात येतं’, असं ते सांगतात. आणि म्हणूनच कलाकाराने पटकथा लेखनाच्या प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे. जेणेकरून लेखकाचा दृष्टिकोन किंवा त्यावरचे वेगवेगळे विचार आपल्या कानावर पडतात. आपोआपच मेंदूत सुप्तपणे त्यावर एक विचार प्रक्रिया घडत राहते. त्यामुळे सहज ती भूमिका कणाकणाने आकाराला येत जाते, त्यासाठी कलाकाराला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत’, असं त्यांनी सांगितलं.
‘चांदोबा’सारख्या गोड कथाच हव्यात का..
आपण चर्चा करतो की दाक्षिणात्य चित्रपट असूनही ‘बाहुबली’ कसा चालला..आपल्याकडे तर आता मराठी चित्रपट कुठल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे असं विचारलंच जात नाही. ते म्हणतात, मोबाइलवर चित्रपट कधी येणार आहे? दक्षिणेकडे लोक आपल्या कलाकारांचे चित्रपट पाहायला आधी जातात. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे हिंदी बोललेलंही खपत नव्हतं. तेव्हा त्यांनी जी मेहनत ३०-४० वर्ष घेतली त्याचा आज त्यांना फायदा मिळतो आहे. ‘रोजा’ हा पहिला चित्रपट होता जो हिंदीत डब करून आपल्याकडे दाखवला गेला आणि काश्मीरमध्ये जाऊन नायक दाक्षिणात्य भाषेत बोलतो आहे हे आपल्याला तेव्हा अजिबातच खटकलं नाही. प्रादेशिक भावभावना वैश्विक स्तरावर पोहोचू शकतात, ही जाणीव या चित्रपटांनी याआधीच करून दिलेली आहे.
‘आरआरआर’, ‘पुष्पा’सारखे चित्रपट हे ऐंशी-नव्वदच्या दशकात मुलांना जे ‘चांदोबा’च्या कथा आवडायच्या तसे वाटतात. त्यात छान छान दिसणाऱ्या स्त्री-पुरुषांची चित्रं, गोड गोड गोष्ट असायची. लोक त्याच्यात गुंतून जायचे. मग मराठीतही आता हेच करून पाहायचं का? वास्तववादी विषय किंवा मुद्दे हे सोडूनच दिले पाहिजेत. अशा एखादे सार किंवा तात्पर्य सांगणाऱ्या ‘चांदोबा’मधल्या कथांसारख्या गोड गोष्टींचे चित्रपटच दाखवायचे. तरच कुठेतरी बहुतेक मराठी चित्रपट आर्थिकदृष्टया सक्षम होतील, अशा शब्दात त्यांनी मराठी चित्रपटांबाबत दिसणाऱ्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली.