चित्रपटसृष्टीमध्ये कोणी प्रेमकथांचा नायक असतो, तर कोणी गंभीर भूमिका साकारणारा ‘गुणी’ अभिनेता. प्रत्येक भूमिके साठी ठरावीक चेहरे ठरलेले असतात. अर्थात, टीव्ही क्षेत्रात एखादा आला की तो ‘सास-बहू’ मालिकांमध्ये गुंतत जातोच. पण, आता या टीव्ही कलाकारांनाही ‘रिअ‍ॅलिटी शोज्’ची नवी वाट सापडली आहे. या वाटेवरचे कलाकार वर्षभर नियमितपणे येणाऱ्या विविध रिअ‍ॅलिटी शोज्ना हजेरी लावतात. त्याशिवाय मात्र टीव्हीवर त्यांचं ‘दर्शन’ दुर्लभ असतं. दरवर्षी येणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोज्च्या नव्या पर्वामध्ये हे चेहरे सतत बदलतही राहतात. आजपासून ‘स्टार प्लस’वर ‘नच बलिये ७’ सुरू होत आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांवर एक दृष्टिक्षेप टाकला, तर त्यातील बरेचसे कलाकार वर्षभरात कोणत्या ना कोणत्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये येऊन गेले आहेत, असे लक्षात येईल.
एकता कपूरने यंदाच्या ‘नच बलिये’ची सूत्रं हाती घेतल्यावर आता काय नवीन पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वानाच होती. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कराराबाबत कडक शिस्तीची असलेल्या एकताने सुरुवातीपासून परवानगीशिवाय शोबद्दल एकही गोष्ट बाहेर जाणार नाही, याची पूर्ण खात्री घेतली. परीक्षकांपासून ते स्पर्धकांपर्यंत सर्वानाच अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. सर्वप्रथम तिने प्रीती झिंटा, नृत्यदिग्दर्शक मर्झी आणि लेखक चेतन भगत यांना परीक्षकपदी नक्की केलं. त्यातून ‘चेतन भगत का?’, याची उत्सुकता कायम ठेवली. त्याचे उत्तर शोच्या बदललेल्या स्वरूपामध्ये दडलेले आहे. यंदा शो केवळ स्पर्धकांच्या नाचावर अवलंबून नसेल, तर त्याऐवजीही प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे. स्पर्धकांच्या नात्यातील ‘खरेपणाची परीक्षा’ही यावेळी शोमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी जोडय़ांमधील पुरुषांना वेगळे आणि स्त्री स्पर्धकांना वेगळे राहण्यासाठी सोय करून देण्यात आली आहे. ‘बिग बॉस’च्या धर्तीवर या जोडय़ांनाही तीन महिने बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क ठेवता येणार नाही. फक्त सरावाच्या वेळेस या जोडय़ांना आपल्या जोडीदाराला भेटण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शोमध्ये यंदा नाचासोबतच दोन घरांमधील भांडाभांडी, वादावादी पाहायला मिळणार असं चित्र आहे. गेल्या वर्षी ‘बिग बॉस’च्या विमानाच्या संकल्पनेमुळे अशा प्रकारची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यात स्पर्धकांना नक्की परदेशात नेणार आहेत की भारतातच, घर कसं असेल हेही सांगितलं नव्हतं. पण, त्यानंतर शो सुरू झाल्यावर काही दिवसांतच मूळ विमानाचा सेट रद्द करावा लागला होता. निर्मात्यांनी सुरुवातीला ठरविलेले सर्व बदल रद्द करून शोची गाडी परत मूळ पदावर आली होती. ‘नच बलिये’च्या या ‘अति’गुप्ततेचा परिणामही असाच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.rv11शोच्या स्पर्धकांबद्दल बोलायचं झाल्यास एकताची कृपादृष्टी झालेले आणि वर्षभर सरावाने सर्व रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजर राहिलेले कलाकार येथेही आहेत. रश्मी देसाई मागच्या वर्षी तिची मालिका संपल्यापासून ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ या शोजमधून चर्चेत येत होती. तिच्यासोबत नवरा नंदिश संधूसुद्धा ‘खतरों..’मध्ये होता. सना खानही ‘खतरों..’मधील तिच्या ‘बेधडक’ स्टंट्सच्या कौशल्याने चर्चेत आली आहे. करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल हे एकमेकांना ‘बिग बॉस’च्या आधी ओळखतही नव्हते. पण, या शोमध्ये त्यांचं सूत जमलं आणि त्याचा परिणाम म्हणजे ‘नच बलिये’मधील यंदाची ही ‘सर्वात महागडी’ जोडी असल्याचं सांगितलं जातं.
अमृता खानविलकर आणि नवरा हिमांशू मल्होत्राची ओळखच रिअ‍ॅलिटी शोमधली. अमृताला हिंदीमध्ये शोशिवाय ओळखणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. जी कहाणी करिश्मा आणि उपेनची तीच कहानी पायल रोहतगी आणि संग्राम सिंगची. मुष्टीयोद्धा संग्रामने पायलसोबत ‘बिग बॉस’च्या घरात सूत जुळवल्यावर टीव्हीलाच आपलं दुसरं घरं बनवलं. त्यामुळे या शोमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल काहीच आश्चर्य वाटण्यासारखं नाही. शोचा सूत्रसंचालक ऋत्विक धनजानी मागच्या पर्वाचा विजेता आहे.
 ‘नच बलिये’च्या नंतर त्यानेही मालिकांऐवजी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करणं पसंत केलं. शोचा परीक्षक मर्झी टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शोजमुळेच पुढे आला, तर प्रीतीनेही चित्रपटांमधील आपली कारकीर्द संपुष्टात आल्यावर टीव्हीवर सूत्रसंचालन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. अर्थात, चेतन भगतच्या पुस्तकातील पात्रही एखाद्या रिअ‍ॅलिटी शोच्या स्पर्धकांपेक्षा कमी नसतात, हे एव्हाना सर्वाच्या लक्षात आलंच आहे. त्यामुळे सर्वच एकाच सूत्रात बांधलेले आहेत. पुढचा आठवडा हा या स्पर्धकांचा असणार आहे. एकताची ‘अतिगुप्तता’ नीती स्पर्धकांबरोबरच शोलाही फळते की बुडवते हे लक्षात यायला फार दिवस लागणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा