सध्या अनेक वाहिन्यांवर ‘रिअॅलिटी शोज’ सुरू असतात. त्यातीलच एक म्हणजे ‘झलक दिखला जा’ हा एक. या कार्यक्रमाला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. असे कार्यक्रम होतकरू कलाकारांसाठी महत्त्वाचे असतात, यातूनच त्यांची कारकीर्द घडते असे मत नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा याने व्यक्त केले आहे.
बॉलिवुडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रेमोला खरी ओळख टिव्हीवरील रिअॅलिटी शोजमधूनच मिळाली. सध्या तो त्याच्या ‘एबीसीडी २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये गुंतला असला, तरी कलर्सवरील ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. यावेळी बोलताना एका डान्सरच्या कारकिर्दीला योग्य वळण देण्यासाठी रिअॅलिटी शोज महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
मी आज बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर झालो आसलो तरी या रिअॅलिटी शोजमधून दरवेळी काहीतरी नवीन शिकण्याची संधी मी सोडत नाही. अशावेळी नव्याने येणाऱ्या डान्सरसाठी हे शोज किती महत्त्वाचे असतात याची कल्पना करू शकता.
येथे तुम्हाला नवनवीन नृत्यप्रकार, शैली शिकायला मिळतात, तज्ञांचे सल्ले मिळतात. त्यांचा तुमच्या पुढील आयुष्यात नक्कीच फायदा होतो. तसेच या शोजमधून काम केलेल्या डान्सरना पुढे जाऊन बॉलिवूडची दारं पण खुली होतात. या शोजच्या निमित्ताने स्पर्धकांमध्ये शिस्त आणि सातत्यपुर्वक मेहनतीची भावना तयार होण्यास मदत होते. त्याच्या चित्रपटांमधील अनेक चेहरे त्याला याच शोज दरम्यान मिळाल्याचे रेमोचे म्हणणे होते.
टीव्हीवरील रिअॅलिटी शोज
एका डान्सरची आणि त्याच्या नृत्यदिग्दर्शकाची कारकीर्द घडवण्यात मोठा हातभार लावतात.
-रेमो डिसुझा, नृत्यदिग्दर्शक