भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा विवाह काही वेळातच पार पडेल. प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आणि पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आनंद पिरामल याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. तर प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याचेही गिन्नी छत्रथ हिच्याशी लग्न करत आहे. या दोन्हीही लग्नांच्या मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहेत. आता या दोन्हीही जोडप्यांनी लग्नासाठी ठरवून आजची तारीख निवडली आहे. याचे कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार, आज १२ डिसेंबर हा लग्नासाठी उत्तम मुहूर्त असल्याचे म्हटले जात आहे. आज विवाह पंचमी असल्याने हा दिवस चांगला असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन लग्नांशिवायही आज देशात इतरही अनेक जोडपी लग्नगाठ बांधणार आहेत.

मार्गशिर्ष महिन्यातील पंचमी असून हा दिवस लग्नासाठी चांगला आहे. द्वापारयुगात याच दिवशी राम आणि सीतेचे लग्न झाले असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवसाला आणखी जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे इशा अंबानी आणि कपिल शर्मा या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी हीच तारीख निश्चित केली आहे. इशाच्या लग्नाच्या आधीचे संगीत, डान्स, मेहंदी हे विधी उदयपूर येथे साजरे करण्यात आले. त्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्यापासून जगभरातील नामवंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर इशाचे लग्न मुंबईतील अँटीलिया या अंबानींच्या प्रसिद्ध वास्तूमध्ये होणार आहे. त्यासाठी अँटीलिया सजवण्यात आले आहे. तर कपिल शर्मा अमृतसरमध्ये गिन्नी छत्रथ हिच्यासोबत सात जन्माच्या आणाभाका घेणार आहे.