सध्या कलाविश्वात सर्वाधिक चर्चा कोणत्या सेलिब्रिटी कपलची होत असेल तर ती म्हणजे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची. रणबीरने आलियासोबतच्या नात्याची कबुली देताच चाहत्यांना या जोडीविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोघांच्या आवडीनिवडी असो किंवा लग्नाविषयीचे प्लॅन्स.. आलिया आणि रणबीर आता प्रसारमाध्यमांसमोर मोकळेपणाने बोलू लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत खुलासा केला आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली की, ‘लग्नाचा विचार इतक्यात केला नाही. पण मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहायचं नाहीये. त्यामुळे मला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्यासोबत राहायचे असल्यास मी लग्न करेन पण लिव्ह- इनचा पर्याय अवलंबणार नाही.’
‘राजी’ चित्रपटाच्या यशानंतर आलियाने स्वत:च्या यशाचा आलेख आणखी उंचावला आहे. सध्या चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यावर अधिकाधिक भर असून लग्नाचा विचार इतक्यात केला नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. ‘मी बऱ्याच गोष्टी ठरवून करत नाही. समोर परिस्थिती जशी येईल तसे मी निर्णय घेते. वयाच्या ३०व्या वर्षी मी लग्न करावं असं अनेकांना वाटत असावं पण कदाचित मी त्याआधीच लग्न करून चाहत्यांना थक्क करू शकते. त्यामुळे लग्नाबाबत कोणतेही प्लॅन्स सध्या नाहीत,’ असं ती म्हणाली.
वाचा : ..अखेर बिग बींची मनधरणी करण्यात नागराज मंजुळेंना यश
सध्या रणबीर आणि आलिया आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ‘ब्रम्हास्त्र’मध्ये आलिया आणि रणबीरसोबत बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही असणार आहेत. याशिवाय टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयही या चित्रपटातून झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून पुढच्या वर्षी तो प्रदर्शित केला जाणार आहे.