कलाकार-तंत्रज्ञ यांचे पैसे बुडवणे, एखाद्याची संकल्पना स्वत:च्या नावावर खपवणे अशा अनेक गोष्टींमुळे याआधीही बदनाम झालेल्या मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. हिंदी मालिकांमधील एक यशस्वी चेहरा असलेल्या मुग्धा चाफेकर हिने लिहिलेल्या आणि ‘इम्पा’कडे नोंदवलेल्या कथेच्या शीर्षकाची ‘चोरी’ करून त्या शीर्षकाखाली चित्रपटाची निर्मिती सुरू करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याबाबत संबंधित निर्मात्यांना ‘इम्पा’ने नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता मुग्धाने अखेर या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून त्या नोटिशीलाही अद्याप उत्तर मिळालेले नाही.
‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’, ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ अशा हिंदी मालिकांमध्ये मुग्धाने अभिनेत्री म्हणून काम केले आहे. आता तिने एका मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा लिहून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची तयारी केली आहे. या चित्रपटाचे ‘कमिंग सून’ हे शीर्षक नोंदवण्यासाठी मुग्धाने ‘सुप्रा फिल्म्स’ या निर्मितीसंस्थेद्वारे डिसेंबर २०१३ मध्ये ‘इम्पा’कडे अर्ज केला होता. ‘इम्पा’ने फेब्रुवारी २०१४ मध्ये मुग्धाच्या ‘कमिंग सून’ या शीर्षकाची नोंदणी झाल्याचे पत्रही पाठवले.
मात्र अचानक जून २०१४ मध्ये ‘फेसबुक’वर याच नावाच्या एका चित्रपटाची प्रसिद्धी सुरू झाल्याचे मुग्धाच्या लक्षात आले. ‘बीलाइन एण्टरटेन्मेण्ट’ या निर्मितीसंस्थेद्वारे संबंधित चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे कळल्यावर मुग्धाने ‘इम्पा’कडे धाव घेतली. ‘इम्पा’नेही २५ जून रोजी ‘बीलाइन एण्टरटेन्मेण्ट’ला पत्र पाठवून ‘कमिंग सून’ हे शीर्षक ‘सुप्रा फिल्म्स’ने आधीच नोंदवल्याचे त्यांना कळवले. तरीही ‘फेसबुक’वरील पोस्ट आणि चित्रपटाचे चित्रिकरण चालूच राहिल्याचे मुग्धाने पुन्हा एकदा ‘इम्पा’च्या निदर्शनास आणून दिले. ‘इम्पा’ने ११ जुलै रोजी पुन्हा एकदा पत्र पाठवून ‘बीलाइन एण्टरटेन्मेण्ट’ला ताकीद दिली. पण त्यांच्याकडून याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
चित्रपटाची कथा किंवा शीर्षक ही ‘बौद्धिक संपदा’ असते. त्याची अशी उचलेगिरी होणे चूक आहे. विशेष म्हणजे ‘इम्पा’कडे शीर्षक नोंदवल्याचे कळवूनही संबंधित निर्माते व दिग्दर्शक यांनी चित्रपटाची निर्मिती अथवा ‘फेसबुक’वरील प्रसिद्धी थांबवली नाही. त्यामुळे ३० जून रोजी मी ‘सुप्रा फिल्म्स’तर्फे त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. मात्र त्यास अद्याप उत्तर आलेले नाही, असे मुग्धाने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. याबाबत ‘बीलाइन एण्टरटेन्मेण्ट’च्या संजय संकला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader