बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची आणि रेखा यांची प्रेमकहाणी साऱ्यांनाच ठाऊक आहे. कधी काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांच्या नात्यामध्ये काही कारणास्तव दुरावा आला. त्यातच अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी लग्न केल्यानंतर रेखा आणि अमिताभ यांच्या नात्यात दुरावा आला. तेव्हापासून आजतायागत या दोघांच्या नात्यातील हा दुरावा कायम आहे. अमिताभ बच्चन यांचे स्वतःचे आनंदी कुटुंब आहे, तर दुसरीकडे रेखा मात्र आजही एकट्याच आहेत. परंतु रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्याविषयी एखादा प्रश्न विचारला तर त्यावर त्या मनमोकळेपणे बोलताना दिसतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून त्या ठिकाणाहून बाजूला जाण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतेच फोटोग्राफर डब्बु रत्नानी यांच्या कॅलेंडरचं लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मात्र या सा-यांमध्ये रेखा यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. डब्बु रत्नानी यांनी सेलिब्रिटींना फोटो काढण्यासाठी एक खास जागा तयार केली होती. याठिकाणी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते नवोदित कलाकारांपर्यंत साऱ्यांचे फोटो लावण्यात आले होते. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी फोटो काढून घेतले. त्यानंतर रेखा यादेखील डब्बू रत्नानी आणि त्यांच्या मुलांसह फोटो काढण्यासाठी या ठिकाणी आल्या. प्रथम रेखा यांनी डब्बु आणि त्यांच्या मुलांसह काही फोटो काढले. त्यानंतर मात्र त्यांचा सोलो फोटो काढण्याची वेळ आली. यावेळी त्यांच्या मागे अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहताच त्यांनी या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, अमिताभ यांचा फोटो पाहताच रेखा यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथून निघून गेल्या. विशेष म्हणजे काही झालंच नाही अशा आविर्भावात त्या वावरत होत्या. मात्र काही काळासाठी त्या गोंधळल्या होत्या हे मीडियाच्या कॅमेराने कैद केलं.