बॉलीवूडमधील ‘सौंदर्यवती’ रेखा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली आहे. रेखा आता गेल्या पिढीतील नायिका झालेली असली तरी ती तशी वाटत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. आजही फिल्मी पाटर्य़ा, मुहूर्त किंवा बॉलीवूडमधील कार्यक्रमांना रेखा जेव्हा हजेरी लावते तेव्हा छायाचित्रकारांचा गराडा तिच्याभोवती असतोच असतो. चर्चेत राहणारी रेखा आता ‘सुपर नानी’ झाली आहे. याच नावाच्या आगामी हिंदी चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या नावावरून रेखा यात ‘आजी’च्या भूमिकेत असणार आहे, हे कळत असले तरी तिचा गेटअप आणि मेकअप यामुळे ती कुठेही ‘नानी’न वाटता सुपर हिरॉईनच दिसते. इंद्रकुमार आणि अशोक ठकेरिया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात रेखासह शर्मन जोशी, श्वेता कुमार, अनुपम खेर, रणधीर कपूर आदी कलाकार आहेत. चित्रपटात रेखा ‘भारती भाटिया’ या सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत आहे. घरच्यांच्या आग्रहावरून ती आपला गेटअप सतत बदलताना या चित्रपटात दाखविली आहे. आधुनिक झालेली रेखा चित्रपटात कुठेही ‘नानी’ असल्याचे वाटत नाही. हा चित्रपट कौटुंबिक आणि विनोदीपट आहे. चित्रपटात रेखा ‘सुपर नानी’ झाली असली तरी प्रत्यक्षात ती नानी वाटत नाही. त्यामुळे रेखाचे चाहते आणि प्रेक्षक ही ‘सुपर नानी’ कशी स्वीकारतात, याकडे बॉलीवूडचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader