रवींद्र पाथरे

हल्ली घटस्फोटांचं प्रमाण समाजात वाढलंय. त्याचबरोबर पुनर्विवाहाचं प्रमाणही वाढते आहे. अशा घटस्फोटितांच्या आणि त्यानंतर पुनर्विवाह केलेल्यांच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांचं आयुष्य हा खरं तर विचार करण्याजोगा चिंतनीय विषय. यात गुंतलेल्या व्यक्तींचं आयुष्य गुंतागुंतीचं असतंच, पण त्याहून अधिक त्यांच्या वाढत्या वयातील मुलांचं आयुष्य या सगळ्या फरफटीत कसं घडतं वा बिघडतं ही अधिकच चिंतेची बाब असते. याच घटितावर आधारित ‘नात्याची गोष्ट’ हे नाटक यंदाच्या हौशी राज्य नाटय़स्पर्धेत सादर झालं होतं. ते अंतिम फेरीत तिसऱ्या क्रमांकाने विजेते ठरलं. हा विषय अधिक लोकांपर्यंत जावा म्हणून नागबादेवी कलामंच, हिरा आर्ट अकॅडमी यांनी या नाटकाचे व्यावसायिक रंगमंचावर प्रयोग करायचं ठरवलं. पण त्यासाठी त्यांना निर्माते मिळेनात. मग त्यांनी प्रेक्षकच आपले निर्माते असं ठरवून ‘एक रुपयात प्रयोग’ ही संकल्पना राबवायचं ठरवलं. एक रुपया तिकीट आणि नंतर प्रयोग पाहून स्वेच्छेने प्रेक्षक देतील ती बिदागी या संकल्पनेवर आजवर पस्तीसेक प्रयोग या मंडळींनी केले आहेत.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….

प्रा. नरेश नाईक लिखित आणि नीलेश गोपनारायण दिग्दर्शित ‘नात्याची गोष्ट’ हे नाटक अशा तऱ्हेने प्रेक्षक प्रतिसादावर रंगमंचावर प्रयोग करीत आहे. या नाटकाचा विषय हा समाजातील एक ज्वलंत विषय आहे. एका घटस्फोटित स्त्रीने- सुशीलाने बऱ्याच वर्षांनंतर पुनर्विवाह करून मनोहररावांशी नवा संसार थाटण्याचं धाडस केलंय. त्यांची आधीची पत्नी अकाली निधन पावलीय. त्यांना श्री नावाचा बारावीत असलेला मुलगा आहे. सुशीलालाही घटस्फोटित पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा (विनय) आणि एक मुलगी (बबडी) आहे. घटस्फोटानंतर विनय स्वेच्छेने बापाकडे गेलेला आहे.

आपल्या पालकांच्या या नव्या संसारात श्री आणि बबडीला अॅडजस्ट होताना काहीसा त्रास होतोय. तरीही दोघं आपापल्या परीनं आपल्या पाल्यांच्या नव्या जीवनात सुकून मिळवण्याचा प्रयत्न करताहेत. या सगळ्यात सुशीलाची कमालीची घालमेल होतेय. बबडी आणि श्रीशी जुळवून घेताना ती परोपरीनं प्रयत्न करतेय. हळूहळू ती दोघं रुळताहेतही.

एवढय़ात विनय अचानक दत्त म्हणून सुशीलाच्या घरी उपस्थित होतो. तो सुशीलाला आपल्या घरी येण्यासाठी हट्ट करतो. ज्या मुलाने आपल्या बापाकरता आपल्याशी नातं तोडलं तोच विनय आता नव्या संसारात रमलेल्या सुशीलाला स्वत:च्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरतोय. तिनं त्यास नकार दिल्यानंतर तो सुशीलाच्या घराबाहेर धरणंच धरतो. त्याच्या या पवित्र्यानं सगळं घर डिस्टर्ब होतं. मनोहरराव त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. सुशीलाही ‘मी आता नव्या संसारात रमलीय. मी तुझ्यासोबत आता परत येऊ शकत नाही,’ असं त्याला सांगते. पण तो हट्टालाच पेटलेला असतो. सुशीला यातून मार्ग काढण्यासाठी मॅरेज कौन्सिलर शमाला बोलावून घेते. तीही त्याला समजवायचा खूप प्रयत्न करते. पण तो म्हणतो, ‘मी तिचा जन्मदाता कायदेशीर मुलगा आहे. माझा माझ्या आईवर नैसर्गिक हक्क आहे. मी तिला काहीही झालं तरी घेऊन जाणारच.’ त्याचा युक्तिवाद बिनतोड असतो. सगळे त्याला परोपरीनं समजवायचा प्रयत्न करतात. पण त्याचा आपला एकच हेका : ‘मी माझ्या आईला घेऊन जाणारच.’

शेवटी यातून काय पर्याय निघतो, सुशीला त्याच्याबरोबर जाते का, मनोहररावांच्या नव्या संसारात खोडा पडतो काय, या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकातच शोधायला हवीत.लेखक प्रा. नरेश नाईक यांनी हा एक नेहमीचाच, परंतु अलक्षित विषय घेऊन त्यावर नाटकाची मांडणी केली आहे. व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर, त्यातल्या निर्णयांवर अधिकार असतो की परिस्थितीनं निर्माण केलेल्या गुंत्यावर त्याला नाइलाजानं वागावं लागतं, हा यक्षप्रश्न यातून उभा ठाकतो. घटस्फोटितांच्या आणि त्यानंतर पुनर्विवाह केलेल्यांच्या आयुष्यावर त्यांचा हक्क असतो की त्यांनी जन्म दिलेल्या मुलांचा, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न यातून मांडलेला आहे. त्याचं नैतिक वा कायदेशीर उत्तर निश्चितपणे देणं अवघडच. व्यावहारिक उत्तर दिल्यास त्यात गुंतलेल्या व्यक्तींचं काय, त्यांच्या भावभावनांचं काय, हा प्रश्नही उभा ठाकतोच. लेखकानं हा तिढा मोठय़ा कौशल्यानं नाटकात आकारला आहे. सुरुवातीच्या चाचपडण्यानंतर नाटक आपल्या पायावर उभं राहतं. ही समस्या निश्चितच चिंतनीय आहे. पण एवढय़ा खोलात विचार आजकाल कुणीच करत नाही. या प्रश्नाची व्यावहारिक उत्तरंच शोधली जातात. पण त्यामुळे हा प्रश्न अस्तित्वातच नाही असं नाही. लेखकानं त्याचा वेध घ्यायचा बऱ्यापैकी प्रयत्न यात केला आहे. या समस्येचा अखेरीस सकारात्मक नोटवर शेवट केला गेला असला तरी तो प्रत्येक वेळी तसाच होईल असं नाही. ही समस्या कायमच असणार आहे. ती व्यक्त झाली किंवा केली गेली किंवा नाही, तरी तिचं अस्तित्व तिच्याशी झुंजणाऱ्या मुलांच्या आयुष्यात असणारच आहे. लेखकानं काहीशा बाळबोध पद्धतीनं याची मांडणी केली आहे. विनयला सुरुवातीला व्हिलन ठरवून त्यांनी आपली सहजी सुटका करून घेतली आहे. त्यामुळे या नाटकाचा सकारात्मक शेवट अपरिहार्य वाटत नाही. तो मारूनमुटकून केला गेलेला आहे. भावनिकतेचं परिमाण त्यासाठी वापरलं गेलं आहे. विशिष्ट परिस्थितीत अडकलेल्या माणसांची गोची हा या नाटकाचा विषय. त्यातून लेखकानं सोप्या पद्धतीनं आपली सुटका करून घेतली आहे.

दिग्दर्शक नीलेश गोपनारायण यांनी हा विषय पुरेशा परिणामकारकतेनं हाताळला आहे. विनयचा बिनतोड मुद्दा त्याच्या मवाली वागण्यानं रास्त ठरत नाही, हीच यातली खरी गोम आहे. बाकी घटना-प्रसंग त्यांनी बऱ्यापैकी फुलवले आहेत. यातली भावविवशताही त्यांनी चांगलीच बाहेर काढली आहे. आणि स्वत: यातली विनयची कोरडी, शुष्क भूमिकाही उत्तमरीत्या पेलली आहे.

नाटकाचं नेपथ्य (रचना : तुषार घरत, गौरव वणे, मेहुल राऊत) सूचक तसंच वास्तवदर्शी यांच्या संमिश्रणातून साकारलेलं आहे. ते हौशी पातळीवरचं आहे. राजेश शिंदे यांची प्रकाशयोजना नाटकाची गरज पुरवणारी. हितेश सांदने यांचं संगीत नाटय़ांतर्गत मूड्स अधोरेखित करणारं आहे.
सरळमार्गी, नाकासमोर चालणारे संसारी मनोहरराव- अद्वैत रुबिना चव्हाण यांनी नेटकेपणाने साकारले आहेत. त्यांची घटस्फोटाचे टक्केटोणपे खाऊन आता कुठं नव्या संसारात रुळू पाहणारी पत्नी सुशीला- दीपाली शहाणे यांनी त्यांच्या वागण्या-वावरण्यातून सहज उत्स्फूर्त उभी केली आहे. समजदार श्रीच्या भूमिकेत अधिराज कुरणे शोभले आहेत. नटखट बबडी धनश्री साटम जेवढय़ास तेवढी व्यक्त झाली आहे. मॅरेज कौन्सिलर शमा झालेल्या अनघा प्रियोळकर त्यांच्या भूमिकेत फिट्ट आहेत. विनय झालेले नीलेश गोपनारायण आपल्या भूमिकेचं बेअरिंग शेवटपर्यंत सांभाळून आहेत. म्हटलं तर फुकट गेलेला, आपल्या हक्कांबद्दल कमालीचा जागरूक असलेला, सुशीलाच्या पहिल्या लग्नापासूनचा फरफट झालेला मुलगा त्यांनी सगळ्या भावच्छटांसह उत्तम वठवला आहे. त्याचं अखेरचं परिवर्तन मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी साजेसं नाही. अर्थात तो दोष संहितेचा.

एकुणात, कौटुंबिक नात्यांतला एक अलक्षित तिढा मांडू पाहणारं हे नाटक त्यांच्या वेगळेपणासाठी आवर्जून पाहायला हवं.

Story img Loader