रेखाच्या ‘खूबसूरत’चा रिमेक होणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होती. मात्र आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अनिल कपूरने ‘खूबसूरत’च्या रिमेकसाठी वॉल्ट डिस्ने स्टुडिओशी हातमिळवणी केली आहे.
अनिल कपूर आणि त्याची मुलगी रिया कपूर यांनी वॉल्ट डिस्ने स्टुडिओच्या सहकार्याने ‘खुबसूरत’चा रिमेक करण्याचे ठरविले आहे. यात रेखाने रंगविलेली मंजू ही व्यक्तिरेखा सोनम कपूरच्या वाटय़ाला आली आहे. तर किरण खेर, रत्ना पाठक-शहा आणि आमिर रझा हुसैन यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असून दिग्दर्शन शशांक घोष करीत आहे. आता चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळलेला शशांक घोष हा मुळातला पटकथा लेखक असून त्याने अनेक प्रसिद्ध जाहिरातींचे दिग्दर्शन या आधी केले आहे. चित्रीकरण राजस्थानातील बिकानेरमध्ये सुरू झाले असून २०१४ च्या जून-ऑगस्ट दरम्यान चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
‘खुबसूरत’ हा संपूर्णपणे कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट होता. मुळात या चित्रपटाची पटकथा सशक्त होती आणि त्यात रेखा, अशोक कुमार, राकेश रोशन, दीना पाठक यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट अधिकच बहारदार झाला होता. आता इतक्या वर्षांनी या चित्रपटाचा रिमेक करताना आजच्या काळातले संदर्भ वापरून पुन्हा एकदा सशक्त पटकथा लिहिणे गरजेचे होते. त्यासाठी आम्ही पटकथेवर भरपूर मेहनत घेतली असल्याचे अनिल कपूर यांनी म्हटले आहे. या चित्रपटाची कथा जगात कुणालाही आवडू शकेल अशी असल्याने रिमेकही सगळ्या स्तरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे, असे अनिल कपूरने सांगितले. तर ‘खुबसूरत’ची कथा आणि त्याचे प्रेक्षकांशी जोडले गेलेले अतूट नाते यामुळे चित्रपटाच्या रिमेकसाठी वॉल्ट डिस्ने स्टुडिओने मान्यता दिल्याचे डिस्ने यूटीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सांगितले. डिस्नेचे चित्रपट आणि कार्यक्रम बघत माझ्या मुली मोठय़ा झाल्या. त्या दोघांचे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे अनिल कपूरने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा