रसिका शिंदे

मराठी अथवा हिंदी मालिका किंवा चित्रपट इतर भाषांमधील आशयांचा रिमेक असतात अशी चर्चा कायमच मनोरंजन सृष्टीत रंगत असते. मराठी मालिकाही या चर्चाना अपवाद नसतात. एकीकडे इतर वेळी हिंदीत लोकप्रिय झालेल्या मालिकांचा मराठी भाषेत रिमेक होत असताना, गेली काही वर्ष मराठी मालिकांच्या आशयाची आणि विषयांची भुरळ हिंदी भाषेसह इतर भाषांनाही पडलेली दिसते. मराठी मालिका आणि त्यांच्या आशयाला मिळणारी लोकप्रियता आणि वाढता टीआरपी यामुळे मालिकांची ख्याती हिंदीसह अन्य प्रादेशिक वाहिन्यांपर्यंत पोहोचते आहे. त्यामुळेच मराठी मालिकांचा रिमेक अन्य भाषांमध्ये केला जातो आहे. 

मराठी मालिकांचा आशय हा कायम कौटुंबिक असतो. आपली संस्कृती, आपली मायबोली जपण्याचाही  प्रयत्न मालिकांच्या लेखक, दिग्दर्शकांनी केलेला अनेकदा अनुभवायला मिळतो. अशा वेळी एखाद्या प्रादेशिक वाहिनीवर लोकप्रिय झालेला आशय विविध भाषेत आणण्याचा वाहिनी समूहाचा कायम प्रयत्न असतो. त्यामुळे आजवर दाक्षिणात्य भाषेतून हिंदीत आणि हिंदीतून मराठीत असा आजवरचा साधारण रिमेकचा प्रवाह राहिला आहे. परंतु सध्या मराठीतील आशयाला हिंदी आणि अन्य प्रादेशिक वाहिन्यांकडून मागणी वाढताना दिसते आहे.

मराठी मालिकांचा अन्य प्रादेशिक भाषेत रिमेक होण्याचा एक महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे मराठी भाषा, आशय, समाजातील वास्तव, संस्कृती या सगळय़ा गोष्टी अन्य प्रादेशिक वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या त्या मालिकांमधून तिथल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. मराठी भाषेतही दखल घेतला जावा असा आशय तयार होत असल्याची माहिती प्रादेशिक वाहिन्यांवरील दिग्दर्शक, लेखकांपर्यंत पोहोचते. उदाहरणार्थ, ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेचा रिमेक ‘सोर्हत नी मिसेस सिंघम’ या नावाने ‘कलर्स गुजराती’ वाहिनीवर प्रसारित झाला आहे. तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा रिमेक बंगाली भाषेत करून तो ‘कलर्स बंगाली’ वाहिनीवर प्रेक्षकांची मने जिंकते आहे. तर ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचे डिबग गुजराती भाषेत होणार असून लवकरच ‘कलर्स गुजराती’ वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

रिमेकचं हे गणित चालतं कसं? ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या सर्व मालिकांचा मालकी हक्क हा ‘कलर्स’ वाहिनीकडे असतो. आणि ज्यावेळी अन्य भाषेत त्यांचा रिमेक करायचा असे ठरते त्यावेळी‘‘कलर्स’ वाहिनीच्याच इतर भाषिक वाहिन्यांवर त्या मालिका प्रसारित केल्या जातात. ‘ज्यावेळी मराठी भाषेतील आशय इतर भाषांमध्ये रिमेक करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो त्यावेळी आपली मराठी भाषा किंवा आपली संस्कृती अटकेपार गेल्याची सुखद भावना मनात येते. तसेच, आपल्या वाहिनीचे नाव महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती देखील वाढते. एकूणच आपल्या भाषेतील मूळ आशयाला मिळालेली ही मानवंदना आहे, अशा शब्दांत ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख विराज राजे यांनी आनंद व्यक्त केला.

हिंदी चित्रपटांना दाक्षिणात्य चित्रपट मागे टाकत आहेत असे एकूण चित्र सध्या दिसून येते आहे. ‘कांतारा’ चित्रपटाने तिकीट खिडकीवर भरघोस कमाई केलीच, पण अन्य भाषिक रसिक प्रेक्षकांच्या मनातही जागा निर्माण केली. या चित्रपटाचा उल्लेख करत ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ची निर्माती श्वेता शिंदे म्हणतात, ‘‘माझ्या मालिकेचा अन्य भाषेत रिमेक होतो आहे याचा एक निर्माती म्हणून आनंद तर आहेच, किंबहुना आता याहून जास्त प्रमाणात वेगळा आशय प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची जबाबदारीही वाढली आहे. ‘कांतारा’ सारख्या चित्रपटाने एक गोष्ट नक्कीच शिकवली ती म्हणजे भाषा महत्त्वाची नसते. महत्त्वाचा असतो तो म्हणजे आशय. त्यामुळे आशय जर प्रेक्षकांना भावला तर नक्कीच मालिका यशस्वी ठरते’’, असे श्वेता यांनी सांगितले.

पेशाने डॉक्टर असलेला डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव अर्थात देवीसिंग या लोकांचे प्राण वाचवणारा नाही तर लोकांचे प्राण घेणारा राक्षस असतो आणि तो कशाप्रकारे हत्या करत असतो, का करत असतो ही सत्यघटनेवर आधारित कथा मांडण्याचा प्रयत्न ‘देवमाणूस’ या मालिकेतून करण्यात आला होता. या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. सध्या या मालिकेचा रिमेक कन्नड भाषेत ‘डॉ. कर्णा’ या नावाने केला असून ‘झी कन्नडा’ वाहिनीवर ती प्रसारित झाली आहे. तर अ‍ॅण्ड टीव्ही वाहिनीवर ‘हैवान’ या नावाने ही मालिका हिंदी भाषेत डब करण्यात आली. याशिवाय, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा रिमेक कन्नड भाषेत ‘सीथा रामा’ या नावाने झाला आहे. या सोबत ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचाही रिमेक कन्नड भाषेत करण्यात आला होता.

मराठी भाषा, मराठी संस्कृती अटकेपार नेण्याचे काम चित्रपटांनी केले असले तरी सामान्य कुटुंबाची कथा, समाजातील निराळे विषय मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मराठी वाहिन्या करत आहेत. आणि आता मराठी मालिकांच्या आशयांना इतर प्रादेशिक भाषकांकडून वाढत असलेली मागणी हे मराठी मनोरंजन विश्वासाठी आनंददायी आहे.