काही वर्षांपूर्वी सुपरकार आणि स्पोर्ट्स बाइकचे प्रस्थ हॉलिवूड चित्रपटांमध्येच जास्त असल्याचे पाहायला मिळायचे. पण, बॉलिवूडमध्येही सध्या हा ट्रेंड बराच चर्चेत आला असून सुपरकार्स, स्पोर्ट्स बाईक्स आणि कस्टमाइज गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जुन्या काळातील चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कारपासून ते आता चित्रपटांमध्ये वापरला जाणाऱ्या कोट्यवधींच्या कार पाहता हा बदल आपल्या लगेचच लक्षात येतो. लांबलचक इम्पालापासून ते अगदी हल्ली पाहायला मिळणाऱ्या ऑडी किंवा बुगाटी या कारपर्यंत बरेच ट्रेंड बॉलिवूडमध्येही आले. त्यातच एका कारने अनेकांचे लक्ष वेधले होते. ती कार म्हणझे, ‘टार्झन’. ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही अफलातून कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती.
२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ती कार खऱ्या अर्थाने एका नव्या ट्रेंडसाठी कारणीभूत ठरली. कित्येकांनी तर या कारसाठीच चित्रपट पाहण्याचा हट्ट केला होता. ‘मलाही अशीच कार हवी’, असा हट्ट धरणारे बरेचजण आज वयाने मोठे झाले असले तरीही त्यांच्या मनात या ‘वंडर कार’चे स्थान मात्र कायम आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकेकाळी प्रेक्षकांच्या आणि सुपर कारच्या प्रेमात असणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या त्या कारची आता मात्र दुरावस्था झाली असून, एका गॅरेजमध्ये ती धूळ खात पडली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार जवळपास १३ वर्षांपूर्वीची ही कार एका गॅरेजमध्ये दुर्लक्षित अवस्थेत पडली आहे. विक्रम आदित्यशुक्ला आपल्या कॉलेजला जात असताना गॅरेजमध्ये असलेल्या या ‘वंडर कार’वर त्याची नजर पडली. त्यानंतर त्याने कारचे काही फोटोही काढले. त्याने काढलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आल्याचे कळते.
वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…
वत्सल सेठ आणि आएशा टाकिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातील कारची अवस्था अगदी वाईट असून, त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाहीये. लक्ष गेले तरीही ही ‘टार्झन’ कार असल्याचे लक्षात येत नाहीये, कारण, कारच्या बऱ्याच भागाचा रंग गेला असून, काही भागावर गंजही चढला आहे. शिवय बऱ्याच प्रमाणात कारचे नुकसानही झाले आहे. सहसा चित्रपटांमध्ये वापरलेल्या काही अनोख्या वस्तू संग्रही ठेवल्या जातात. पण, ‘टार्झन’च्या बाबतीत मात्र तसे काहीच झाल्याचे दिसत नाहीये हीच खंत सध्या व्यक्त केली जातेय.