आपल्या तडफदार स्वभावानं आणि लक्षवेधी अभिनयानं अभिनय क्षेत्रावर आपली छाप उमटवणारी कलाकार म्हणजे भक्ती बर्वे. आजही फुलराणी म्हटलं की भक्ती यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. अशा या कलासंपन्न अभिनेत्रीचा आज वीसावा स्मृतीदिन. चला यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी अनेक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. त्यातल्या ती फुलराणी, आई रिटायर होतेय या नाटकातल्या त्यांच्या भूमिका तर अजरामर झाल्या. आई रिटायर होतेय हे नाटक बा रिटायर थाय छे या नावानं गुजराती भाषेतही झालं. त्यातही त्यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, कळलाव्या कांद्याची कहाणी, चिनी बदाम, जादूची वेल, वयं मोठं खोटम् अशा बालनाट्यांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. अखेरचा सवाल, अजब न्याय वर्तुळाचा, गांधी आणि आंबेडकर, रंग माझा वेगळा ही त्यांची काही प्रमुख नाटके. रातराणी ह्या नाटकाचे प्रयोग त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांमधून केले.

याशिवाय त्यांनी अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं. १९८३ सालच्या जाने भी दो यारो तर १९९८ सालच्या हजार चौरसिया की माँ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ती फुलराणी हे त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक. “तुला शिकवीन चांगलाच धडा” म्हणत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या नाटकाचे तर ११११हूनही अधिक प्रयोग झाले. नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

भक्ती या काही काळ आकाशवाणी तसंच दूरदर्शनवर वृत्तनिवेदिकाही होत्या. हिंदी अभिनेते शफी इनामदार हे त्यांचे पती. १२ फेब्रुवारी २००१ साली ह्या फुलराणीचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. भक्ती यांचं काम प्रत्यक्ष पाहिलेली पिढी तर त्यांच्या प्रेमात आहेच पण त्यानंतरच्या पिढ्यांनाही त्यांचं काम स्फूर्ती देणारं ठरत आहे आणि हे पाहून प्रत्येकजण म्हणतो, “ही फुलराणी पुन्हा होणे नाही.”