टीव्हीवरच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा याने नृत्यावरील पहिला थ्रीडी चित्रपट करण्याच्या ध्यासातून ‘एबीसीडी’ चित्रपट दिग्दर्शित केला. आता आपल्याला ज्ञात असलेल्या नृत्य प्रकारांची संपूर्ण माहिती देणारे पुस्तक लिहिण्याची त्याची इच्छा आहे. नृत्याच्या इतिहासापासून आजवर त्यात झालेले बदल, विविध शैली यावर तो लेखन करणार आहे.
‘एबीसीडी’ (एनीबडी कॅन डान्स) या नृत्यावर आधारित पहिल्यावहिल्या थ्रीडी चित्रपटावर रेमोचे जोरदार काम सुरू आहे. यात प्रभुदेवा, गणेश आचार्य यांसारख्या मातब्बरांबरोरच ‘रिअ‍ॅलिटी शो’मधून नुकत्याच प्रकाशझोतात येऊ पाहणाऱ्या सलमान युसूफ खान, धर्मेश येलांडे, पुनीत पाठकसारख्या नवोदित स्पर्धकांपर्यंत अनेकजण या चित्रपटात आपला पदन्यास दाखवणार आहेत. प्रभुदेवा या चित्रपटाचा नायक आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच आपण पुस्तक लिहिण्याची तयारी सुरू करणार असल्याचे रेमोने सांगितले.
‘एबीसीडी’मध्ये कथ्थक, भरतनाटय़म्, कुचीपुडी, ओडिसी, कोलातम, घुमर, यक्षगान सारख्या पारंपरिक नृत्यशैली पहायला मिळणार आहेत. या नृत्यशैलींबरोबरच आपल्याला माहीत असणाऱ्या पन्नास विविध नृत्यशैलींविषयीची माहिती रेमो आपल्या पुस्तकात देणार आहे. ‘एबीसीडी’ हा थ्रीडी चित्रपट आणि हे पुस्तक या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फार खास आहेत. नृत्यावर आधारित चित्रपट करावा, हा विचार फार आधीपासून माझ्या मनात घोळत होता. नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत असताना कुठेतरी या गोष्टीची तयारीही मी करत होतो. आता हे स्वप्न पूर्ण होणार असल्याने मी कमालीचा आनंदी आहे. नृत्यावर आधारित अमेरिकन रिअ‍ॅलिटी शो ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ची विजेती लॉरेन गॉटलिबचीही ‘एबीसीडी’मध्ये महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती रेमोने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा