सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यानंतर आता येत्या आठवड्यात या कार्यक्रमात विशेष पाहुण्या म्हणून आपल्या ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राची कन्या अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
‘साधी राहणी, उच्च विचार’ ही उक्ती सुधा मूर्ती या तंतोतंत पाळतात. येत्या ‘कोण होणार करोडपती’च्या खेळात येत्या शनिवारच्या भागात त्या सहभागी होणार आहेत. दर आठवड्यातील शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधील असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
“मी सिद्धार्थच्या प्रेमात पडले कारण…”, वाढदिवसानिमित्त मितालीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
सुधा मूर्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील ‘श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ’ या शाळेसाठी हा खेळ खेळणार आहेत. शालेय शिक्षणाबद्दल असलेल्या आस्थेपोटी त्या या खेळात सहभागी होणार आहेत. मूळच्या ‘कुलकर्णी’ असलेल्या सुधा मूर्तींचे बालपण कुरुंदवाड येथे गेले. त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे त्यांची मराठी मातीशी नाळ ही घट्ट जोडली गेली. सुधा मूर्ती यांना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे.
Video : मराठी मालिकेत वटपौर्णिमेचा उत्साह; पल्लवी, अप्पू आणि गौरीनेही घेतला उखाणा
‘कोण होणार करोडपती’ या खेळासाठी सुधा मूर्ती यांनी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी परिधान केली आहे. लहानपणीच्या आठवणी, संस्कार, एकटी मुलगी म्हणून इंजिनिअरिंग करताना आलेले अनुभव, टाटा यांच्याबरोबर काम करत असतानाचा समृद्ध अनुभव अशा विविधांगी रंजक गोष्टींनी हा विशेष भाग रंगणार आहे. सुधा मूर्ती या प्रस्थापित असून त्यांनी केलेले विस्थापितांसाठींचे कार्य गौरवास्पद आहे. पती नारायण मूर्ती यांच्याबरोबर ‘इन्फोसिस फाउंडेशन’ची धुरा सुधा मूर्ती यांनी सक्षमपणे सांभाळली आहे.
समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या सुधा मूर्ती यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक खास पर्वणी ठरणार आहे.