ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर विनोदाचे बादशाह अशोक सराफ हे सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत. त्यांना या मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी निश्चित पर्वणी ठरणार आहे.
यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत. त्यामुळेच त्यांची गणना ही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये केली जाते. सिनेसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरुन ठेवल्या आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होत असतात. त्यानुसार पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्या आणि त्यांना आधार देणार्या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ हे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.
“मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते त्याऐवजी…”; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने केला खुलासा
अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘नवरा माझा नवसाचा’ असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. ‘ययाती’पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आताच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर ते सिनेनाट्यसृष्टीतील अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.
रिक्षा चालक ते नगरविकास मंत्री, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास
मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्सेही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तसेच लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी ताज्या केल्या. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्साही त्यांनी सांगितला. अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग अधिकच रंगतदार होणार आहे.