‘स्टार प्रवाह’वरील ‘लक्ष्य’ मालिकेतील प्रसिद्ध ‘युनिट ८’च्या अधिकाऱ्यांमध्ये इन्स्पेक्टर रेणुका राठोड या नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश झाला आहे. हिंदी आणि मराठी मालिकोंमधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री श्वेता शिंदे ही रेणुकाच्या भूमिकेत दिसणार असून तिच्या नेतृत्वाखाली ‘युनिट ८’ ची टीम कशाप्रकारे गुन्हेगारांचा शोध घेणार याची थरारक कथा ११ डिसेंबरपासून गुरुवार ते रविवार रात्री १० वाजता या मालिकेत पाहता येईल. ‘लोकसत्ता’ या मालिकेचा माध्यम प्रायोजक आहे.
इन्स्पेक्टर रेणुका राठोडचा वऱ्हाडी ठसका भल्याभल्या गुन्हेगारांची झोप उडवणार आहे. ‘युनिट ८’ची टीम आता विशेष प्रकरणे हातात घेणार असून ‘दहशतवाद विरोधी लढा’, ‘चांदीची तस्करी’ अशी मोठमोठी प्रकरणे या टीमकडे देण्यात आली आहेत. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे अशा वेगवेगळ्या शहरातील प्रकरणे ‘युनिट ८’ची टीम हाताळणार आहे. इन्स्पेक्टर रेणुका राठोड तसेच ‘युनिट ८’च्या पोलिस अधिकाऱ्यांचे थरारक स्टंट्स आणि अॅक्शनदृश्ये हे ‘लक्ष्य’चे खास आकर्षण असणार आहे.
अशाप्रकारचे स्टंट्स आणि अॅक्शनदृश्यांचे चित्रण पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाहिनीवर दिसणार आहे. याशिवाय, जीपीएस तंत्रज्ञान, फोरेन्सिक लॅबही पुढच्या भागात अधिकाऱ्यांच्या दिमतीला असणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने स्त्री व्यक्तिरेखांना नेहमीच प्रेरणादायी भूमिकेत दाखवले आहे. इन्स्पेक्टर रेणुका राठोड हे याचे उत्तम उदाहरण आहे, असे ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील म्हणाले.
मालिका ‘स्टार प्रवाह’वर ११ डिसेंबरपासून गुरुवार ते रविवार रात्री १० वाजता.
माझे बालपण साताऱ्यात गेले आहे. मीरा बोरवणकर, अशोक कामटे यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांची नियुक्ती बराच काळ साताऱ्यात होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पाहतच मी मोठी झाले. या सगळय़ांचा ठसा माझ्या मनावर होता. एक तडफदार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न होते. या मालिकेच्या निमित्ताने ते पूर्ण झाले आहे.
– श्वेता शिंदे