भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत कर्तव्यपथ म्हणजेच राजपथावर तिन्ही सैन्यदलांकडून परेड सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी कर्तव्यपथावर विविध चित्ररथांमधून भारतीय संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळते. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे मराठमोळा संगीतकार कर्तव्यपथ गाजवताना दिसत आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या चित्ररथावर मराठी संगीतकार कौशल इनामदार यांचं संगीत ऐकायला मिळणार आहे. कौशल इनामदार यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
कौशल इनामदार यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. यात ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा चित्ररथ पाहायला मिळत आहे. त्यात तुम्हाला माझे संगीत पाहायला मिळत आहे. ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”
“पण मी माझ्या मित्रांशिवाय हे करु शकलो नसतो. अमित पाध्ये, अनिल करंजवकर, सिद्धेश जाधव, नंदेश उमप, गायिका अमृता खोडके-दहिवेलकर, प्रगती जोशी, मधुरा परांजपे आणि विवेक कांबळी यांचे मनापासून आभार”, असे कौशल इनामदार यांनी म्हटले आहे.
दरम्यान भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला.
महाराष्ट्र ही संत, देवदेवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात ज्याप्रकारे अनेक समाजसुधारक होऊन गेले, तशीच महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा राहिली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन आज दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घेता आले.