रेश्मा राईकवार

मनातल्या निरगाठी आपल्याही नकळत अलगद सोडवणारं, आपल्याला काय हवं आहे हे कोणाकडे व्यक्त व्हायच्या आत त्याची सहज पूर्ती करणारं, ना प्रेमाच्या आणाभाका.. ना लाडीगोडी.. ना मोठमोठाले प्रेमाचे सोहळे साजरे करण्याची गरज. या सगळय़ापलीकडे जात आपला हात घट्ट धरून चालणारा आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळणं ही आत्ताच्या इन्स्टन्ट लव्ह-ब्रेकअपच्या काळात तशी अवघड गोष्ट. त्यातही असा जोडीदार मिळाला तरी आर्थिक-सामाजिक अशी सगळी रूढ व्यावहारिक समीकरणं बाजूला सारून ते प्रेम स्वीकारायचं.. असं कुठे असतंय होय? वाटायला लावणारी परिस्थिती आजूबाजूला आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक महेश लिमये यांनी आपल्याला दूर उत्तराखंडमध्ये अचानकपणे भेटलेल्या वर्सोवा कोळीवाडय़ातला अतिसामान्य तरुण जग्गू आणि अमेरिकेतून आलेल्या ज्युली चितळे या तरुणीची नितळ प्रेमकथा पडद्यावर अप्रतिम रंगवली आहे. किमान या दोघांना तरी व्यावहारिक शहापणाच्या चौकटीपलीकडे असलेलं हे जीवापाड प्रेम गवसावं अशी कळ प्रेक्षकांच्या मनात जागवण्यात त्यांचे जग्गू आणि ज्युलिएट यशस्वी ठरले आहेत.

परस्परविरोधी वातावरणात वाढलेल्या जग्गू आणि ज्युलिएट यांची प्रेमकथा ही मराठीतली ताजीतवानी, काहीशी अवखळ, थोडी प्रगल्भ भासली तरी खटय़ाळपणा जपणारी आणि कॅमेऱ्याच्या लेन्समधून अप्रतिमपणे हिरव्याकंच निसर्गाच्या सान्निध्यात खुलत जाणारं नितळ भावविश्व टिपत रंगलेली प्रेमकथा आहे. प्रेम हा या चित्रपटाचा मुख्य धागा आहे. त्यामुळे केवळ जग्गू आणि ज्युलिएट यांच्यापुरती ते मर्यादित नाही. घटस्फोटाच्या उंबऱ्यावर असलेलं तरुण दाम्पत्य, वडिलांपासून दुरावलेली मुलगी, मूल नाही म्हणून कवितेलाच मूल मानून जगणाऱ्या पतीचं प्रेमळ मन जपणारी पत्नी.. असे चेहरे आणि त्यांच्या मनातील गुंता आपल्यासमोर ठेवत मना-मनांची स्पंदनं प्रेमाने कशी जोडली जातात, याचं सुंदर भावचित्रण ‘जग्गू आणि ज्युलिएट’च्या माध्यमातून महेश लिमये यांनी रंगवलं आहे. दोन परस्पर विरोधी वातावरणात वाढलेले आणि एकमेकांपासून भिन्न असलेले दोन जीव नकळत प्रेमाच्या अद्वैताने जोडले जातात. त्यांचा हा प्रेमाच्या द्वैतातून अद्वैतापर्यंतचा प्रवास आपल्यासमोर देवभूमीच्या निसर्गरम्य साक्षीने उलगडत जातो. अर्थात इथे कथा संकल्पना महेश लिमये यांची आहे. दिग्दर्शकीय मांडणीही त्यांची आहे. आणि ते मुळात उत्तम छायाचित्रणकार असल्याने त्यांच्या लेन्समधून निसर्गही बोलका होतोच, मात्र कलाकारांच्या नजरेतून त्यांचे भाव थेट आपल्यापर्यंत पोहोचतात.

उत्तराखंडची पार्श्वभूमी चित्रपटाला आहे. पण म्हणून तिथला निसर्ग प्रत्येक वेळी फ्रेममधून डोकावतो किंवा प्रत्येक फ्रेम सुंदरच दिसली पाहिजे. नायक आणि नायिका दोघेही अमुक एकाच अँगलमधून आखीव-रेखीवपणे दिसले पाहिजेत, हा अट्टहास चित्रपटाच्या मांडणीत कुठेही दिसत नाही. जग्गूचे आग्री भाषेतील संवाद, त्याचा धसमुसळेपणा आणि ज्युलिएटचा साधेपणा, कमीतकमी मेकअप आणि इतर अलंकारिक गोष्टींचा वापर यामुळे चित्रपटातील सहजपणा जपला गेला आहे. केवळ मुख्य जोडीच नाही तर एकूणच अन्य कलाकारांच्या व्यक्तिरेखांचे चित्रणही तितक्याच साध्या पद्धतीने करताना त्यांच्या निवडीबाबतही काही प्रयोगही केले गेले आहेत. अविनाश नारकर आणि सविता मालपेकर, अंगद म्हसकर आणि अभिज्ञा भावे अशा नेहमीच्या पडद्यावरील जोडय़ांपेक्षा वेगळय़ा जोडय़ा चित्रपटात दिसतात. कलाकारांची निवड आणि अभिनयाच्या बाबतीत अत्यंत श्रीमंत असलेला असा हा चित्रपट आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी ही जोडी या आधी ‘झोंबिवली’ चित्रपटातून प्रेक्षकांनी पाहिली आहे, मात्र इथे प्रेमी युगूल म्हणून त्यांना पाहणं हा सर्वस्वी नवा अनुभव आहे. अमेयकडे असलेली नैसर्गिक विनोदी अभिनयाची भक्कम बाजू आणि वैदेहीचा कुठलाही अभिनिवेश नसलेला सहज अभिनय, तिच्या चेहऱ्यातला गोडवा याचबरोबरीने या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचाही खूप सुंदर उपयोग दिग्दर्शकाने करून घेतला आहे. अमेयची ऊर्जा, त्याचा अभिनय, त्याचा आग्री भाषेचा हेल आणि संवाद फेक.. जणू तो संपूर्ण पडदा व्यापून उरतो. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, समीर धर्माधिकारी, हृषीकेश जोशी प्रत्येकजण नेहमीपेक्षा वेगळय़ा भूमिकेत चित्रपटात दिसले आहेत. मात्र या जमेच्या बाजू असल्या तरी जग्गू आणि ज्युलिएट या दोघांची कथा आणि त्याच वेळी इतर व्यक्तिरेखांच्या समांतर कथा सुरू असल्याने दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात धरून चालल्यासारख्या एकत्रित पोहोचत नाहीत. कुठल्या ना कुठल्या बाजूचे पारडे वरखाली होत राहते. अजय – अतुल यांचे संगीत असलेली गाणी जमून आली असली तरी प्रेमकथेच्या अनुषंगाने विचार करता ती आणखी श्रवणीय असती तर त्याची अधिक जोड मिळाली असती. अर्थात या दोघांच्या प्रेमाचा अध्याय पुढेही सुरू राहील, असा संकेतही आपल्याला चित्रपटाच्या शेवटी मिळत असल्याने पुढच्या भागाची आशा आणि ऊर्जा हा चित्रपट देऊन जातो.

जग्गू आणि ज्युलिएट
दिग्दर्शक – महेश लिमये, कलाकार – अमेय वाघ, वैदेही परशुरामी, मनोज जोशी, हृषीकेश जोशी, समीर चौगुले, अविनाश नारकर. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे.