अलिगढ विद्यापीठात मराठी शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाला त्याच्या समलैंगिक संबंधांवरून गुन्हेगार करार देण्यात आला. त्याला कामावरून काढून टाकलं गेलं, त्याच्यावर समाजाने बहिष्कार टाकला आणि तरीही समाजाच्या विरोधात पुन्हा उभं राहून आपल्याला न्याय मिळावा यासाठी लढणारा हा प्राध्यापक एके दिवशी आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. त्यांनी आत्महत्या केली, असे सांगितले गेले. वरवर दिसणाऱ्या या घटनेमागचे गुंते हे आज सर्वोच्च न्यायालयात ज्या कलम ३७७ वर खल सुरू आहे, त्याच्याशी जोडले गेले आहेत. ‘अलिगढ’ चित्रपटाच्या निमित्ताने समलिंगी संबंधांना कायदेशीर गुन्हा ठरवणाऱ्या या क लम ३७७ वर फेरविचार सुरू झाला, याबद्दल खूप आनंद वाटतो, असे अभिनेता मनोज वाजपेयी याने सांगितले.
हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ हा चित्रपट सध्या दोन विरोधाभासी कारणांवरून चर्चेत आहे. अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरास यांची सत्यकथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केला आहे. गेले वर्षभर आंतरराष्ट्रीय महोत्सवातून गाजणारा हा चित्रपट इथे रीतसर प्रदर्शित होत असताना वादात सापडला आहे. हा चित्रपट पाहण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली त्यामागचे कारण खूप महत्त्वाचे आहे. समलिंगी संबंधांवर गुन्हा म्हणून केलेले शिक्कामोर्तब योग्य आहे का? यावर पुन्हा नव्याने विचार सुरू झाला आहे. त्यामागे ही चळवळ उभी रहावी म्हणून प्रयत्न केलेल्या प्राध्यापक सिरास यांचाही वाटा आहे. ज्या कारणामुळे सिरास यांना समाजाने गुन्हेगार ठरवलं आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यावर आपल्याला नव्याने विचार करावासा वाटतो आहे, हा बदल खूप महत्त्वाचा आहे, असे या चित्रपटात सिरास यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मनोज वाजपेयी यांनी सांगितले. चित्रपटांचा समाजावरचा प्रभाव खूप मोठा आहे. त्यामुळे ‘अलिगढ’सारखी चित्रकृती एका नव्या विचाराची, बदलाची निमित्त ठरली तर कलाकार आणि एक माणूस म्हणून मिळणारे समाधान खूप मोठे असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याच वेळी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या विषयावरूनच धास्ती घेतली असून त्याला ‘प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिल्याने वादाची ठिणगी पडली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटासंदर्भात घेतलेल्या पवित्र्याबद्दल मनोज फारसे काही बोलत नाहीत. चित्रपटाविषयी दोन्ही बाजूने होणारी चर्चा अंतिमत: चित्रपटाला पुढे नेणारीच ठरणार आहे, असं त्याने विश्वासाने सांगितलं.
‘अलिगढ’ या चित्रपटाची कल्पना जेव्हा हंसल मेहतांनी सांगितली तेव्हा या चित्रपटाच्या विषयावरून समाज ढवळून निघेल, असं आपल्याला वाटलं नव्हतं, अशी मनमोकळी कबुली त्याने दिली. सिरास यांची व्यक्तिरेखा आणि त्यांच्यावर झालेला अन्याय हा विषय कुठे तरी मनाला भिडला आणि ती त्याच भावनेतून शंभर टक्के मेहनतीने साकारली असल्याचे मनोजने सांगितलं. सिरास यांची भूमिका साकारणं तितकं सोपं नव्हतं. मात्र ती कथा आणि विषय दिग्दर्शक म्हणून हंसल मेहतांच्या डोक्यात इतका पक्का होता की अभिनेता म्हणून आपली मांडणी कशी असावी, असा विचार करण्याची गरजही पडली नाही. सामाजिक विषय ज्या संवेदनशील पद्धतीने मांडायला हवेत, ज्या हुशारीने मांडायला हवेत ते कसब हंसल मेहतांकडे आहे. पाहणाऱ्याला साधी घटना वाटत असेल, मात्र चित्रपटातून ती मांडताना नेमकं लोकांना काय कळायला हवं, याबाबत हंसल मेहतांच्या विचारांमध्ये स्पष्टता असते. आणि आता जो चित्रपटाला प्रतिसाद मिळतो आहे ते पाहता तो विचार समाजातील त्या नेमक्या ठिकाणी पोहोचला आहे, याची खात्री पटली असल्याचेही मनोज म्हणतो. या चित्रपटात मनोज वाजपेयीबरोबर अभिनेता राजकुमार राव याचीही मुख्य भूमिका आहे. सिरास यांना मदत करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत राजकुमार दिसणार आहे. अभिनेता म्हणून एक तप काम केल्यानंतर राजकुमारसारख्या नव्या पिढीच्या कलाकारांबरोबर अशा संवेदनशील विषयावरच्या चित्रपटात काम करणे ही आपल्यासारख्या अनुभवी अभिनेत्यासाठीही पर्वणी होती, असे मनोज वाजपेयीने स्पष्ट केले.
आजची कलाकारांची पिढी हुशार आहेच, मात्र आपल्याला जे योग्य वाटतं त्या मार्गाने चालण्याचं धाडस त्यांच्याकडे आहे. इतक्या लहान वयात राजकुमारसारख्या तरुण अभिनेत्याने यशाचा जो मापदंड निर्माण केला आहे तो विलक्षण आहे, अशा शब्दांत मनोज कौतुक करतो. राजकु मारबरोबर काम करताना खूप वर्षांनी अभिनयातील देवाण-घेवाण अनुभवायला मिळाली आणि त्याचा फायदा सिरास यांची व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला झाल्याचे त्याने सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्याला हव्या त्याच पद्धतीचे चित्रपट करून कारकीर्द टिकवणं ही अवघड गोष्ट आहे. मात्र आजचे वातावरण पाहता उशिराने का होईना आपल्याला त्या पद्धतीनेच काम करायला मिळते आहे, याबद्दल तो समाधान व्यक्त करतो. ‘अलिगढ’बरोबरच ‘तांडव’ या लघुपटातही त्याची वेगळी भूमिका आहे. आधी केलं नसेल अशा भूमिका, असं काम करायचं आहे. ‘अलिगढ’, ‘तांडव’ हे चित्रपट झालेच मात्र माझा ‘सात उचक्के’ हा चित्रपट तुम्ही बघाल. हसता-हसता रडवणारा असा चित्रपट आहे. अशी वेगळी मांडणी असलेले चित्रपट कलाकाराला करायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही, असे म्हणणाऱ्या मनोजला ‘अलिगढ’ प्रेक्षकांनीही मनापासून स्वीकारावा असं वाटतं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने समलिंगी संबंधांना समाजात कायद्याने मान्यता मिळाली तर आपल्या कामाचे चीज होईल, असे तो म्हणतो.