मराठी चित्रपट दिवेंसदिवस सशक्त आणि प्रयोगशील होत चालला आहे याचं नेमकं प्रत्यंतर असंच ‘बायोस्कोप’बद्दल म्हणावे लागेल. मानवी भावभावनांचा काव्यात्म कोलाज मांडणारा चार लघुपटांचा चित्रपट हा अनोखा प्रयोग यात दिसून येतो. दीड-दोन तासाची सलग कथा सांगणारे नेहमीच्या धाटणीतले चित्रपट पाहण्याची सवय झालेली असताना चार वेगळे विषय, चार दिग्दर्शकांच्या नजरेतून पाहणं हे याचं नावीन्य. कविता हे कथासूत्र वापरण्यामुळे त्या नावीन्याला धार आली आहे. अत्यंत थोडक्या प्रसंगातून थेट व्यक्त होणारा आणि जाताजाता भाष्यदेखील करणारा हा प्रयोग चांगलाच जमला आहे. किंबहुना चित्रपटाच्याबाबतीत अशीदेखील एक वेगळी वाट चोखाळता येऊ शकते हेच यातून अगदी थेट मात्र सहजपणे प्रतित होत आहे.
आशयघन कवितेमागची भावना पोहचविण्याचा हा अनोखा प्रयोग चित्रपटाच्या परिभाषेत कसा आणि काय बसतो वगैरे विचार न करता आवर्जून पाहावा असा आहे. मिर्झा गालिब, सौमित्र, लोकनाथ यशवंत आणि संदीप खरे अशा चार कविंच्या कवितांना पटकथांमध्ये गुंफताना निर्माण झालेल्या चारही कथा या स्वतंत्र असल्या तरी मानवी भावनांना साद घालणा-या आहेत हे त्यातलं एकसूत्र म्हणता येईल.
चारही कथा वेगवेगळ्या पाश्र्वाभूमीवर घडतात आणि स्वत:चं स्वतंत्र अस्तित्त्व राखत एकाचवेळी तुम्हाला अनेक अनुभव देऊन जातात. महत्त्वाचं म्हणजे ही कथानकं म्हटली तर रोजच्या आयुष्यात दिसणारी आणि म्हटली तर काहीशा वेगळ्या वाटेवरची अशी आहेत. आणि हे सारं मांडण्यासाठीचा जो परीघ अथवा परीप्रेक्ष्य आहे तो तसा मर्यादितच आहे. पण तरीदेखील त्या छोट्याशा परीघात एक मोठा पट उलगडला जाणे हे या लघुपटाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विषयाचा आशय अगदी थेटपणे मांडताना गोष्ट सांगण्याचा चित्रपटाचा बाज न सोडता हे सारं अचूक सांधण्याची किमया या दिग्दर्शकांनी केली आहे.
एकाच वेळी अनेक स्तरांतील प्रेक्षकांसाठी काहीना काही तरी यातून मिळते. पण त्याचवेळी एखाद्याा विषयाची आवड नसणा-या दुस-याला त्याच्याशी जोडून घेणे जड जाऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाबाबतीतली ही उणीव म्हणावी लागेल.
चारही दिग्दर्शकांनी मूळ कवितांना अगदी योग्य असा न्याय दिला आहे. पण चार वेगवेगळे लघुपट असल्यामुळे मांडणीमध्ये देखील फरक पडतो. मुख्यत: सिनेमाटोग्राफीमध्ये आणि सादरीकरणामध्ये. त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडसं डाव उजवं होत राहतं. ही कथा चांगली की ती उत्तम अशी तुलना नकळतपणे होत राहते. त्याचं मुळ दडलय ते अर्थातच सादरीकरणात. बहुतांश कथा या सेटचा वापर न करता वास्तववादी पद्धतीने मांडल्यामुळे त्याचा प्रभाव नक्कीच पडतो. पण त्या मांडणीत कलात्मक अधिक उणे राहून जातं. ‘मित्रा’ आणि ‘दिल ए नादान’ मध्ये ही उणीव भरुन निघते.
एक मात्र नक्की की चारही कवींच्या भावना मात्र अगदी तंतोतंत उतरल्या आहेत. गरज पडेल तेथे निवेदनाचा बाज देत विषयाची उकल अधिक गहिरी होताना दिसते. विशेषत: एक होता काऊ मध्ये हा प्रयोग अधिकच परिणामकारक ठरतो. चार चार कविता घेऊन चार चित्रपट पाहताना महत्त्वाचं म्हणजे हे काही आजच्या राजकीय युतीमहायुतीसारखं कडबोळं वाटत नाही. तब्बल ७१ कलाकार आणि तंत्रज्ञांचा ताफा घेऊन सादर केलेली ही एक काव्य मैफल वाटते. कवितेवर पटकथा बेतण्याचा हा पहिलाच प्रयोग नक्कीच यशस्वी झाला आहे असंच म्हणावं लागेल. अर्थातच हा प्रयोग असल्यामुळे भविष्यात अशाप्रकारच्या आणखीन दर्जेदार प्रयोगाची अपेक्षा करता येईल.
कवीच्या मनातल्या भावभावनांचं प्रकटीकरण चार ओळीत होतं. त्या चार ओळीत भावनांचा कल्लोळ सामावलेला असतो. वाचणारा त्याच्या त्याच्या वकूबानुसार अर्थ लावत त्यात डोकावतो आणि त्यातून जे सुचतं ते म्हणजे बायोस्कोपमधले हे चारही लघुपट. चित्रपटाच्या सुरुवातीलाच गुलजार यांनी केलेले बायोस्कोपचं हे काव्यात्म वर्णन सार्थ अगदी सार्थ ठरल्याचं दिसून येतं.
कथासूत्र
दिले ए नादान
अनेक वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असणा-या निर्मलादेवी इंदोरी (नीना कुलकर्णी) यांच्या उतारवयातील घालमेलीचं अचूक चित्रण मिर्झा गालिबच्या ‘दिले नादान तुझे हुआ क्या है..’ या शेर वर हा बेतलेल्या गजेंद्र अहिरे यांच्या ‘दिले नादान’ लघुपटातून दिसून येतं. मैफली संपल्या, लोकांना नवे पर्याय मिळाले. पण आजवर मैफलीतच अडकून राहीलेला जीव आयुष्याच्या मैफलीच्या समारोपाला मात्र काहीसा विकल होतो. वेड्या आशेवर जगत राहतो. दुसरीकडे काळ संपल्याची जाणीवदेखील असते. पण मनाला आवर कसा घालणार. सारे सोबती निघून गेल्यानंतरही सारंगीवर साथ देणारे मियाजी (सुहास पळशीकर) आणि इंदोरीबाईंच्या आयुष्यातील हा जेमतेम एक दिवसाचा प्रसंग. पण थेट संपूर्ण आयुष्याचा पट उलगडून दाखवतो.
एक होता काऊ
गोर्या रंगाच आकर्षण असलेल्या आपल्या समाजातली काळ्या रंगाच्या लोकांची मानसिकता नेमकी टिपली आहे ती विजू माने यांनी ‘एक होता काऊ’ मध्ये. काळ्या रंगामुळे कावळ्या म्हणूनच ओळख असलेला स्वप्निल (कुशल बद्रिके) आणि टिपिकल ब्राह्मणी घरातील पाकळी जोशी (स्पृहा जोशी) एकमेकावर प्रेम करत असतात, पण आजवर ते अव्यक्तच राहीलेलं असतं. काळ्या रंगाच्या न्यूनगंडामुळे तो बोलत नाही, आणि तो बोलत नाही म्हणून ती पुढाकार घेत नाही. किशोर कदमांच्या कवितेच्या आधाराने कथानक पुढे सरकते. कावळ्याची मानसिक घालमेल अत्यंत प्रभावी मांडत कथानक वेग पकडते. अखेरीस रंगाचा हा न्यूनगंड दूर करण्यासाठी पाकळीच पुढाकार घेते.
बैल
शेतकरी आत्महत्या हा विषय आजवर अनेकवेळा चर्चिला गेलाय. पडद्याावरदेखील मांडून झालाय. पण लोकनाथ यशवंत यांची कविता थोडीशी वेगळी आहे. शेतक-याचा जीव की प्राण असणाºया बैलाची ही कैफियत गिरीश मोहीते यांनी पडद्यावर मांडली आहे. बैल विकावा लागू नये म्हणून शहरात मोलमजूरी करणाºया पंजाबराव सरकटे (मंगेश देसाई) या शेतक-याच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं. ते दूर करायला त्याला अखेरीस बैल विकावा लागतो. पण एकंदरीतच परिस्थितीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा बैलालाच प्रशद्ब्रा पडतो, की आजवर माझ्याकडून तुम्ही अनेक कामं करुन घेतली, मला माझ्या आईपासून तोडलत, माझं तारुण्यदेखील फुलू दिलं नाहीत. आणि अखेरीस मला विकल्यानंतरदेखील तुम्ही परिस्थितीपुढे गलितगात्र होत आत्महत्या का करता? आत्महत्येतला नकारात्मक सूर दूर करुन सकारात्मकता यातून मांडली आहे.
मित्रा
रवि जाधव यांनी एकदमच वेगळी वाट पकडत समलैंगिकता हा विषय, विजय तेंडूलकरांच्या कथेच्या आधारे ‘मित्रा’ या लघुपटातून मांडला आहे. लहानपणापासूनच आपण कोणीतरी वेगळे आहोत याची जाणीव झालेली सुमित्रा (वीणा जामकर) तिच्यावर प्रेम करणारा बालमित्र विन्या (संदीप खरे) या दोहोंभोवती आणि सुमित्राची रुममेट उर्मी (मृण्मयी देशपांडे)यांच्यावर लघुपट बेतला आहे. विन्याच्या प्रेमपत्राला उत्तर देण्याऐवजी सुमित्रा आपली ही वेगळी मानसिकता कथन करते. विन्याला हे सारंच अवघड, विचित्र वाटू लागते. तरी मैत्रीच्या नात्याने तो त्याचा स्वीकार करतो आणि सुमित्राची ‘मित्रा’ होते. देशाला स्वातंत्र्य मिळते, मात्र सुमित्राचे विचार मात्र समाजाच्या पारंपरिक पारतंत्र्यातच अडकून राहतात. ‘उदासिनतेस या कोणता रंग आहे’ या संदीप खरे यांच्या कवितेच्या आधाराने समलैंगिकांबाबतीतल्या समाजाच्या उदासिनतेवर भाष्य करत हे कथानक पुढे सरकते.
बायोस्कोप
निर्माता – अभय शेवडे (गोल्डन एंटरटेनमेंट प्रा. लि.)
असोसिएट प्रोड्युसर – संजय धनकवडे, नेहा पेंडसे, परिक्षीत थोरात
सहनिर्माते – मेघना जाधव, गिरीश मोहिते, विजू माने, वृंदा गजेंद्र
प्रस्तुती – शेखर ज्योती (पीएसजे एंटरटेनमेंट)
लघुपट – दिल ए नादान
दिग्दर्शक, कथा, पटकथा संवाद – गजेंद्र अहिरे
गीतकार – मिर्झा गालिब, गजेंद्र अहिरे
संगीत – नरेंद्र भिडे
गायिका – शुभा जोशी, राजेश दातार, शिल्पा पुणतांबेकर
लघुपट – एक होता काऊ
दिग्दर्शक, कथा – विजू माने
पटकथा – विजू माने, सतीश लाटकर
संवाद – सतीश लाटकर
संगीत – सोहम पाठक
गायक – सोहम पाठक
लघुपट – बैल
दिग्दर्शक – गिरीश मोहिते
कथा – अभय दाखणे
पटकथा – गिरीश मोहिते
संवाद – अभय दाखणे
गीतकार – गुरु ठाकूर
संगीत – अविनाश विश्वजित
गायक – प्रसन्नजीत कोसंबी
लघुपट – मित्रा
दिग्दर्शक, पटकथा, संवाद – रवि जाधव
कथा – विजय तेंडूलकर
संगीत – सलिल कुलकर्णी
सुहास जोशी