-सॅबी परेरा
काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या, जयवंत दळवीच्या प्रचंड गाजलेल्या आणि अनेक भाषांत भाषांतरित होऊन भारतभर पोहोचलेल्या ‘संध्याछाया’ या नाटकात एक वृद्ध जोडपं आहे. हे वृद्ध जोडपे खाऊन-पिऊन सुखी असले तरी त्यांना एक खंत आहे. ज्यांच्याशी बोलावं, सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात, दुखण्या-खुपण्यात लागू पडेल आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला आधार देईल, सोबत करील असं आपलं हक्काचं माणूस आपल्या जवळ नाही याचं शल्य त्यांना सतत टोचत आहे. त्यांना मुलबाळ नाही असं नाहीये. दोन मुले आहेत. त्यापैकी एक परदेशी नोकरी करतोय आणि दुसरा भारतीय सैन्यात आहे. मुलं अधूनमधून पत्र आणि टेलिफोनच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांशी संपर्क ठेवून असली तरी त्या मुलांच्या दृष्टीने आपली नोकरी, आपलं करियर, आपलं भवितव्य हे आपल्या आईवडिलांपेक्षा अधिक महत्वाचं आहे. वृद्ध आईवडिलांनी नाईलाजाने कुरकुरत का होईना हे वास्तव स्वीकारलंय. पण परदेशी असलेला मुलगा तिथल्याच एक मुलीशी लग्न करतो. आपल्या लग्नाविषयी आपल्या आईवडिलांना कळवणेही तो जरुरीचे समजत नाही आणि सैन्यात असलेला मुलगा लढाईत मारला जातो. यामुळे ते वृद्ध जोडपे पूर्णपणे खचून जाते. शेवटी विष प्राशन करून आत्महत्या करते. एक सुन्न करणारा आणि आयुष्याच्या संध्याछायेतील लोकांना अधिक अस्वस्थ आणि निराश करणारा अनुभव देऊन जयवंत दळवीचं संध्याछाया हे नाटक संपतं.
लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘संज्याछाया’ या नुकताच रंगभूमीवर आलेल्या नाटकाचं मूळ कथाबीज देखील ‘संध्याछाया’ प्रमाणेच असलं तरी त्याला दिलेली ट्रीटमेंट पूर्णतः वेगळी आहे. ‘संध्याछाया’ मधून प्रेक्षकाला अस्वस्थ आणि निराश करणारा अनुभव येत होता तर ‘संज्याछाया’ हे नवीन नाटक प्रेक्षकाला सकारात्मकतेचा बुस्टर डोस देते.
आपल्याला स्वतःच आधार व्हायचंय. आपला आनंद आपणच शोधायचाय. मुलांच्या सुखाच्या वर्तुळात आपण बसत नसू तर आपल्याला आपल्या सुखा-समाधानाचे स्वतंत्र वर्तुळ आखावे लागेल. काळाप्रमाणे बदलून आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. वृद्ध आईवडिलांच्या गरजेच्या वेळी, मुलं त्यांच्या दृष्टीने प्रॅक्टिकल वागत असतील तर आईवडिलांनीही प्रॅक्टिकल होऊन मुलांप्रती आपल्या भावनांच्या पारंब्या तोडून टाकायला हव्यात. नोकरी-धंद्यातून निवृत्त झालो म्हणून मरणाची वाट पाहत खुरडत-खुरडत न जगता आपल्याला आनंद देईल अशा कामात, छंदात स्वतःला झोकून दिलं तर आपलं स्वतःचं आयुष्य तर सुखी होतंच सोबत आपल्यातील सकारात्मकतेने आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांचंही आयुष्य आनंदी करू शकतो असा सकारात्मक संदेश ‘संज्याछाया’ हे नाटक घेऊन आलं आहे.
लेखक प्रशांत दळवी यांनी जयवंत दळवीकृत संध्याछायेच्या, प्रेक्षकाला माहीत असलेल्या कथेतून नैराश्याचा आणि नकारात्मकतेचा धागा अलगत उसवून काढून त्याच्याजागी सकारात्मकता विणलीय आणि हे विणकाम बेमालूम जमून आलंय.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी अशी नाटकाची बांधणी केलीय. नाटक कुठेही रेंगाळणार नाही, चर्चात्मक होणार नाही, रंगमंच सतत हलता राहील आणि विनोदाचा शिडकावा, नाटकाच्या मूळ गंभीर गाभ्याला बाधा ठरणार नाही याची काळजी घेतली आहे.
वैभव मांगले आणि निर्मिती सावंत ही बिनीची जोडी फुल्ल एनर्जीने नाटकभर वावरते. योग्यवेळी प्रेक्षकांकडून आपल्या वाट्याचे हसू चोखपणे वसूल करते आणि योग्य वेळी प्रेक्षकाला आपल्या डोळ्याच्या कडा पुसायला लावते. आशीर्वाद मराठे, सुनील अभ्यंकर, योगिनी चौक, अभय जोशी, इत्यादी सहकलाकारांनी देखील आपापल्या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिलेला आहे.
प्रदीप मुळेचं नेपथ्य नाटकाला पूरक असून व पुरुषोत्तम बेर्डेच्या पार्श्वसंगीताने छोट्या-छोट्या प्रसंगाचा आशय अधिक गहिरा करीत एकंदर नाटकाची अचूक लय पकडली आहे. एकंदरीत ‘संज्याछाया’ हे एक मनोरंजनासोबत विचार मांडणारं चांगलं नाटक आहे.