पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट समोर आलं आहे. त्याच्या नुसत्या दर्शनाने सुग्रास अन्नभोजनाची तृप्ती खुणावू लागली आहे. ताटातील पदार्थांची मांडणी, रंगसंगती सगळं कसं आकर्षक आहे, मनाला सुखावणारं आहे. आणि तरीही एकेक घास खरोखर तोंडी घेतल्यानंतर ते काहीसं अळणी लागल्याने त्या भरल्या पक्वान्नांची मजाच निघून जावी अशी काहीशी जाणीव नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘दो पत्ती’ चित्रपट पाहून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दो पत्ती’ या शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित चित्रपटाबद्दल प्रदर्शनाआधीपासूनच उत्कंठा होती. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थात पडद्यावर काजोल आणि क्रिती सॅननसारख्या दोन सशक्त अभिनेत्री एकत्र काम करताना दिसणार होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट या चित्रपटाची कथा लेखिका कनिका धिल्लन यांची आहे. ‘मनमर्जिया’, ‘केदारनाथ’, ‘डंकी’, ‘हसीन दिलरुबा’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ अशा खरोखरच वैविध्यपूर्ण, रंजक चित्रपटांच्या कथा ज्यांनी लिहिल्या त्यांनीच ‘दो पत्ती’ या चित्रपटाचे कथालेखनही केले आहे आणि क्रिती सॅननबरोबर मिळून चित्रपटाची निर्मितीही केली आहे. या चित्रपटात या तीन प्रभावशाली स्त्रियांचा वावर आणि त्यांचा त्यांच्या क्षेत्रातला अनुभव या सगळ्याचं एकत्रित येणं कसं असेल? हा भाग उत्सुकता वाढवणारा होता. कनिका यांनी नाट्यपूर्ण पद्धतीने कथा रंगवण्याची त्यांची परिचित शैली ‘दो पत्ती’च्या लेखनातही अबाधित ठेवली आहे. नुसतीच रंजक कथा देण्यापेक्षा त्याला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांच्या वास्तवतेचं कोंदण दिलं आहे.

हेही वाचा : नाट्यरंग: सीरियल किलर; मालिकावेडाची भयावह, विनोदी परिणती

देवीपूरसारख्या शहरांत विद्या ज्योती ऊर्फ व्हीजे (काजोल) हिची पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. अजून या शहराचं पुरतं भान विद्याला आलेलं नाही. योग्य ते पुरावे सापडले की कायद्यानुसार गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळायला हवी हे तिच्या पोलीस खात्यात असलेल्या वडिलांचं तत्त्व आणि कायदा कितीही चांगला असला तरी गुन्हेगाराची मानसिकता, गुन्ह्यामागचा हेतू लक्षात घेऊन न्याय दिला गेला पाहिजे हे तिच्या वकील आईचं तत्त्व. या दोन परस्परविरोधी तत्त्वप्रणाली असलेल्या घरात लहानाची मोठी झालेल्या व्हीजेने स्वत:पुरती वडिलांचा मार्ग पत्करत पोलिसी खातं स्वीकारलं आहे. तिच्यापुढे नवं प्रकरण दाखल झालं आहे ते सौम्याचं. सौम्याला तिच्या पतीकडून मारहाण होते आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या जखमा हे स्पष्ट सांगतायेत आणि असंच सुरू राहिलं तर तिचा मृत्यू निश्चित आहे. आणि तरीही ध्रुवचं आपल्यावर खूप प्रेम आहे असं सांगत सौम्या पोलिसांकडे तक्रार नोंदवायला नकार देते. पण सौम्याचा जीव धोक्यात आहे आणि ती तिची बहीण शैलीमुळे नवऱ्याविरोधात तक्रार करणार नाही. तुम्हीच काहीतरी करा, असा तगादा सौम्याला सांभाळणाऱ्या माजींनी व्हीजेच्या पाठी लावला आहे. सौम्या आणि शैली या जुळ्या बहिणींची कथा, शैलीचं सौम्याचा तिरस्कार करणं, तिरस्कारापोटी सौम्या आणि ध्रुवच्या लग्नात तिने विघ्न आणणं, ध्रुवचं शैलीला पाहताक्षणी प्रेमात पडणं आणि वडिलांच्या आग्रहापोटी साध्यासुध्या सौम्याशी लग्न करणं, त्याचा अनावर होणारा राग हे सगळे एकेक पदर व्हीजेसमोर येतात. गोष्टीतला तणाव वाढत जातो. एका क्षणी किमान सौम्याच्या क्रूरकथेतला नायक ध्रुव व्हीजेच्या ताब्यात येतो. पण त्यामुळे गोष्ट खरंच संपते की नव्याने सुरू होते?

सौम्याच्या व्यक्तिरेखेपेक्षा शैलीची व्यक्तिरेखा काहीशी किचकट आहे, किमान वरकरणी तशी दिसते. आणि त्यासाठी विनाकारण ‘कॉकटेल’मधल्या दीपिकाच्या व्यक्तिरेखाबरहुकूम क्रितीच्या शैली या पात्राची रचना केली गेली आहे. पण यातली उचलेगिरी चटकन जाणवते. त्या तुलनेत क्रितीने सौम्याची भूमिका अधिक आपलेपणाने केली आहे. अभिनयात ती कुठेही कमी पडत नाही. काजोलसाठी व्हीजेची व्यक्तिरेखा तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि अधिक वास्तववादी शैलीतली आहे. तिच्या मूळ स्वभावाच्या जवळ जाणारी असल्याने तिने ती सहज साकारली आहे. मात्र तिच्या पात्राची लेखनातच अर्थपूर्ण मांडणी झालेली नाही.

हेही वाचा : एकामागोमाग एक १० सिनेमे झाले फ्लॉप, नैराश्यात गेली अभिनेत्री; एक्स बॉयफ्रेंडने वाचवलं करिअर

u

\

गोष्ट पुढे नेण्यासाठी सूत्रधार म्हणून तिच्या व्यक्तिरेखेचा मर्यादित वापर झाला आहे. शाहीर शेखने ध्रुवच्या भूमिकेसाठी जे गरजेचं आहे ते प्रामाणिकपणे केलं आहे. तन्वी आझमी, विवेक मुश्रन यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांनाही त्या तुलनेत फारसा वाव मिळालेला नाही. ब्रजेंद्र कार्ला यांनाही अगदी मोजके दोन-तीन प्रसंग मिळाले असले तरी त्यांनी रंगत आणली आहे. अनेकदा कलाकार – निर्माता हे एकच समीकरण असलं की संबंधित कलाकाराच्या भूमिकेची लांबीरुंदी वाढण्याची शक्यता असते तीच चूक इथे क्रितीच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट वरचढ असूनही त्याचा प्रभाव मर्यादित होतो. ‘दो पत्ती’ हे चित्रपटाचं शीर्षक हुशारीने वापरलेलं आहे, मात्र त्याचा अर्थाअर्थी कथेशी संबंध जोडता येत नाही.

एकीकडे ही पोलीस आणि न्यायव्यवस्थेची कहाणी आहे. व्हीजे त्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करते. दुसरीकडे ही सौम्या – शैली या जुळ्या बहिणींच्या नात्याची, त्यांच्या भूतकाळाची समांतर कथा आहे. ध्रुवसारखे सरंजामी वृत्तीचे पुरुषसत्ताक स्थितीचा उदो उदो करत बेफिकिरीने स्त्रियांना पायदळी तुडवणारे तरुण हाही चिंताजनक विषय इथे आहे. मात्र हे वेगवेगळे विषय कथेतलं नाट्य वाढवण्यापुरते एकत्र येतात. त्यातल्या कुठल्याही एका विषयाला ते खोल स्पर्श करत नाही. मांडणीत रंजकता, थरार आहे. वास्तववादी शैलीच्या जवळ जाणारं चित्रण आणि त्याला तितक्याच ताकदीच्या अभिनयाची जोड त्यामुळे काही प्रसंग मनाला भिडतातही… पण मुळात लेखनातच रंजकतेचा फापटपसारा अधिक आल्याने अळणी आशय असलेलं हे नाट्य मनोरंजनापुरतंच चवीचं झालं आहे.

दो पत्ती

दिग्दर्शक – शशांक चतुर्वेदी

कलाकार – क्रिती सॅनन, काजोल, ब्रजेंद्र कार्ला, शाहीर शेख, तन्वी आझमी, विवेक मुश्रन.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of do patti movie directed by shashank chaturvedi kajol and kriti sanon css