रवींद्र पाथरे

ऐंशीच्या दशकात मनमोहन देसाईंसारखे बिनडोक करमणूकपट काढणारे बरेच निर्माते बॉलीवूडमध्ये होते. प्रेक्षकांनाही या सिनेमांची सवय होती. अर्थात आजही अशा बिनडोकपटांची चलती कमी झालेली नाहीए. मात्र आता नवनव्या तंत्रज्ञानामुळे आणि काहीएक नवे प्रयोग करू पाहणाऱ्या संवेदनशील तरुण सिनेमावाल्यांमुळे बॉलीवूडी सिनेमामध्येही आशय, विषयांचं नावीन्य अधूनमधून बघायला मिळतं, हेही खरंय. बाकी अक्षयकुमार, सलमान खान वगैरेंचे सिनेमे ८० च्या दशकातली ती मेंदूविहीन सिनेमांची परंपरा अजूनही टिकवून आहेत. असो. हे स्मरायचं कारण.. रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘काळी राणी’ हे नाटक! ते ऐंशीच्या दशकातल्या बॉलिवूडवर आधारित आहे. त्याकाळीही हिंदी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या कलावंतांना- त्यातही स्त्री-कलावंतांना शोषणाला बळी पडावं लागत होतं. सिनेमात झळकण्यासाठी ‘काय वाट्टेल ते’ करण्यास तेव्हाही महत्त्वाकांक्षी तरुणी राजी असत. त्यातून एखाद्या समूहदृश्यातलंदेखील किरकोळ काम मिळालं तरी चालेल, पण मोठय़ा पडद्यावर चमकायचंच अशी आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणींचा ओघ देशभरातून मुंबईत येत असे. त्यातल्या किती जणी प्रत्यक्षात सिनेमांतून चमकत आणि किती शोषणाच्या दलदलीत फसून गतप्राण होत याचा हिशेब ना कधी बॉलिवूडने ठेवला, ना ते कधी सिनेमा इंडस्ट्री म्हणवणाऱ्यांनी मान्य केलं. आजही हे दुष्टचक्र सुरूच आहे. उलट, आता अगणित मनोरंजन वाहिन्यांच्या गर्दीने त्यात भीषण भरच पडलेली आहे.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
woman was cheated, lure of government job,
पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २० लाखांची फसवणूक

तर..

ऐंशीच्या दशकात नीरा म्हापसेकर नामे एक देखण्या चेहऱ्याची मुलगी अभिनय कशाशी खातात हे माहीत नसतानादेखील कुणा मध्यस्थामार्फत लालजी पांडे या बडय़ा निर्मात्यापर्यंत पोहोचते. ‘पहुंचे हुए’ लालजी तिच्या रूपावर फिदा होतात. त्या बदल्यात नीरा ऊर्फ लालजींची ही ‘काळी राणी’ त्यांना हवं ते बहाल करते. जयराम जाखडे (तथा मोहित मैत्र) हा तरुण, होतकरू लेखक बॉलिवूडमध्ये नशीब अजमावायला त्याचवेळी लालजींना भेटायला आलेला असतो. आपण सामान्य वकुबाचे लेखक आहोत याची त्याला पूर्णपणे जाणीव असते. परंतु तरीही बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नाव कमावण्याची महत्त्वाकांक्षा तो बाळगून असतो. (त्यांच्या संवेदना मात्र जिवंत असतात.) लालजी त्यालाही राणीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत लेखक म्हणून ब्रेक देतात.

राणी मोहितबरोबरच्या पहिल्याच भेटीत त्याच्याकडे आकृष्ट झालेली असते. कुठलीही गोष्ट भल्याबुऱ्या मार्गाने मिळवायचीच, ही राणीची रीत. ती मोहितवर आपल्या मादक अदांचं मायाजाल टाकते. परंतु मोहित सावध असतो. राणीचं हे आकर्षण आपल्याला तिच्यासकट घेऊन डुबेल हे त्याला स्वच्छ दिसत असतं. त्यात राणीची ही चाल तर नाही ना, अशीही त्याला आशंका असतेच. त्यामुळे तो ताकही फुंकून पिणंच इष्ट या विचारानं राणीपासून शक्य तितकं अंतर राखून असतो. शिवाय बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे पाय रोवून असलेल्या, बारा गावचं पाणी प्यायलेल्या लालजींपासून हे ‘प्रकरण’ लपून राहणं कदापि शक्य नाही हेही तो जाणून असतो. त्यामुळे तो राणीला परोपरीनं समजवायचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्या प्रेमात पागल झालेली राणी काहीएक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसते. उलट ती मोहितलाच धमकावते- ‘तू मला वश झाला नाहीस तर मी स्वत:च हे ‘प्रकरण’ लालजींच्या कानावर घालून तुला इंडस्ट्रीतून बेदखल करेन.’ त्यामुळे एकीकडे राणीबद्दल वाटणारं अनावर आकर्षण आणि दुसरीकडे ‘लालजींना हे कळलं तर..’ या भीतीनं मोहित नित्य दुविधेत असतो. राणीचं आक्रमक लावण्य त्याला तिच्याकडे चुंबकासारखं खेचत असतं; पण लालजींच्या भीतीचं काय करायचं, हाही प्रश्न असतोच.

एव्हाना लालजींच्या लागोपाठ चार सुपरहिट् चित्रपटांतून राणी आणि लेखक म्हणून मोहितने यशाची चव चाखलेली असते. लालजींना आता एक मर्डर मिस्ट्री सिनेमा काढायचा असतो. ते मोहितला त्याचा प्लॉट तयार करायला सांगतात. त्यासाठी प्लॉटचे त्यांना अपेक्षित काही तपशीलही ते त्याला सांगतात. वयात प्रचंड अंतर असणाऱ्या विजोड जोडप्याची कहाणी.. पत्नी पतिव्रता.. तिचा प्रियकर कलावंत असा काहीसा त्रिकोण असावा.. वगैरे. पण यात कुणा एकाचा तरी खून झाल्याशिवाय हा तिढा सुटणं अवघड. त्यामुळे यात एक खूनही व्हायला हवा. परंतु हा खून कुणी प्रत्यक्षात न करता आपसूक व्हायला हवा अशीही अट ते घालतात. मोहित हे चॅलेन्ज स्वीकारतो.

यादरम्यान राणीही हातघाईला आलेली असते. लालजींच्या पंजातून बाहेर पडून आपण लग्न करू या म्हणून ती मोहितच्या मागे लागलेली असते. पण लालजी आपल्या दोघांचंही करिअर बरबाद करू शकतात हे मोहितला पुरेपूर माहीत असतं. त्यामुळे तो लग्नाला राजी होत नसतो. तेव्हा राणी चिरडीला येऊन लालजींना संपवायचीच भाषा करते. ती आता मोहितपासून क्षणभरही दूर राहू इच्छित नसते. त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची तिची तयारी असते.

या नव्या मर्डर मिस्र्टी सिनेमाच्या निमित्ताने मोहित आणि राणी फुलप्रूफ प्लॅन बनवतात..

लालजींनाही या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी त्याची हवा निर्माण करण्याकरता एक खरोखरीचा खून करण्याची आयडिया सुचते. ती ते कशी अमलात आणतात? प्रत्यक्षात असा खून होतो का? कुणाचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाटकातच मिळवणं इष्ट.

लेखक रत्नाकर मतकरींनी बॉलिवूड छापाचं हे योगायोगांनी खचाखच भरलेलं मेलोड्रॅमॅटिक नाटक सिनेमाच्या पटकथेसारखं उलगडत नेलं आहे. त्यात खऱ्या-खोटय़ा, आभासी वाटाव्यात अशा अतक्र्य घटना आहेत, काही डोळेझाक कराव्यात (असं त्यांना वाटतं..) अशा गोष्टी आहेत. फुल्टू बॉलिवूडी चमकधमकवालं वातावरण आहे. तिथले डाव-प्रतिडाव आहेत. शह-काटशह आहेत. मुख्य म्हणजे बटबटीत मेलोड्रामा- जो बॉलिवूडचा प्राण आहे- तो शंभर टक्के इथे मौजूद आहे. सोप्या कथनशैलीतून हे नाटक उलगडत जातं. अर्थात विद्या बालनचा ‘डर्टी पिक्चर’ पाहणाऱ्यांना यातलं ‘नाटय़’ कदाचित खूप मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे. यातली पात्रंही पृष्ठपातळीवरच जगतात. त्यांच्या भावभावनाही कृतक वाटतात. मात्र सत्य आणि आभासाचा हा खेळ प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो खरा. त्यांना काही प्रश्न पडतात. पण त्यांची उत्तरं मिळतातच असं नाही. ‘काही गोष्टी तर्कापलीकडच्या असतात’ हे बॉलिवूडच्या फॅन्सचं गृहितक त्यांना मंजूर असल्याने त्याबद्दल त्यांना खेद वाटत नाही. 

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हा मेलोड्रामा त्याच पद्धतीनं पेश केला आहे. बॉलिवूडमधलं खोटं, आभासी जगणं, घरात एक- बाहेर एक मुखवटा लावून वावरणारी इथली माणसं, त्यांचे जीवघेणे शह-काटशह, लफडी-कुलंगडी या सगळ्या वातावरणाचा फील त्यांनी नाटकभर दिला आहे. परंतु हे सगळं ऐंशीच्या दशकातलं आहे याची जाणीव आपल्याला सतत ठेवावी लागते. त्यामुळे संहितेप्रमाणेच हे आकलनदेखील मध्यमवर्गीयच राहिलं आहे. आजच्या माहिती विस्फोटाच्या दुनियेत खरं बॉलिवूड काय आहे हे आज लोकांना नित्य पाहायला मिळतं आहे. त्यामुळे मतकरींचं हे नाटक आज तकलादू वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. आज ते हयात असते तर त्यांनी कदाचित नव्यानं हे नाटक लिहिलं असतं. असो.

मंदार चोळकर यांच्या प्रभावी शीर्षकगीताला संगीतकार अजित परब यांनी छान संगीत दिलं आहे. प्रदीप मुळ्ये यांनी लालजींचा प्रशस्त, आलिशान बंगला उभा केला आहे. शीतल तळपदे यांनी यातलं गडद नाटय़ प्रकाशयोजनेतून आणखीनच टोकदार केलेलं आहे. मंगल केंकरे यांनी बॉलीवूडचं बाह्य दर्शन वेशभूषेतून साकारलं आहे. राजेश परब यांची रंगभूषा मागणीनुसारी.

हरीश दुधाडे यांनी पाय जमिनीवर असलेला लेखक मोहित संवेदनशीलतेनं वठवला आहे. नव्या, होतकरू लेखकाची द्विधा मनोवस्था, चलबिचल आणि परिस्थितीवश नाइलाजानं कराव्या लागणाऱ्या तडजोडी हे सारं कमालीच्या उत्कटतेनं व्यक्त केल्या आहेत. मनवा नाईक यांनी नीरा ऊर्फ राणीचं बाह्य़ांगी ग्लॅमरस, महत्त्वाकांक्षी अभिनेत्रीचं सोंग आणि आतून कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीसारखीच लग्न, संसाराची असलेली तिची ओढ समजून उमजून साकारलीय. डॉ. गिरीश ओक यांनी लालजी व्हिलनिश होऊ न देता संयमितपणे उभा केला आहे. बॉलिवूडी दुर्गुण आत्मगत केलेला निर्माता त्यांच्यात दिसतो. आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी आणि प्रदीप कदम यांनीही आपली कामं चोख केली आहेत.