रुपेरी पडद्यावर विशिष्ट विकारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या मुलांचे आयुष्य, त्यांच्या पालकांची घुसमट, आयुष्यभर करावा लागणारा संघर्ष यावर चित्रपट येऊन गेले आहेत. ‘चौकट राजा’ या चित्रपटातूनही मतिमंद व्यक्तीचे जीवन रेखाटण्यात आले आहे. परंतु त्यापेक्षा ‘यलो’ हा चित्रपट वैशिष्टय़पूर्ण ठरतो. डाऊन सिंड्रोम या जन्मत: झालेल्या आजाराने ग्रस्त मुलीची कथा वास्तवातील त्या मुलीनेच साकारली आहे हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ असून दिग्दर्शकाने गौरी आणि तिची आई मुग्धा गाडगीळ यांचा संघर्ष सकारात्मक पद्धतीने दाखविला आहे. त्यामुळे फक्त अपंगत्वच नव्हे तर आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर धीराने मात करीत यश मिळविण्याचा प्रयत्न धडधाकट माणसानेही करायला हवा हे चित्रपट अधोरेखित करतो. वास्तवातील गौरी गाडगीळने चित्रपटात साकारलेली तिची स्वत:ची व्यक्तिरेखा आणि सांगितलेली स्वत:ची गोष्ट यामुळे चित्रपट वेगळ्या उंचीवर जातो.
मूळचे छायालेखक असलेले महेश लिमये यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. अप्रतिम छायालेखनामुळे चित्रपट नेत्रसुखद नक्कीच झाला आहे, परंतु छायालेखन दिग्दर्शनावर कुठेही अव्वल ठरणार नाही आणि सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे जे म्हटले जाते त्याला पूर्ण न्याय दिग्दर्शकाने दिला आहे.
गौरी गाडगीळ ही डाऊन सिंड्रोम असलेली विशेष मुलगी आहे. आई-बाबा झाल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असतो. सर्वानाचा आपल्या अपत्यजन्माचा अतीव आनंद होतो, परंतु गौरी गाडगीळच्या जन्मानंतर आणि तिचा विकार समजल्यानंतर तिचे बाबा शेखर गाडगीळ यांना दु:ख होते. समाजात आपली कीव केली जाणार या कल्पनेनेच त्यांना गुदमरल्यासारखे होते. तर गौरीची आई मुग्धा मात्र कशीही असली तरी पोटची मुलगी आहे, तिचा सांभाळ करायला हवा, तिला समजून घ्यायला हवं, कसंही असलं तरी आपलं दोघांचं मूल आहे हे शेखरला सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु तरीसुद्धा शेखर स्वत:च्याच मुलीचा तिरस्कार करू लागतो. एकदा तर गौरी छोटय़ा तलावात बुडायला लागते तेव्हा तिला वाचविण्यापासून शेखर मुग्धाला रोखतो. मुग्धा जिवाच्या आकांताने शेखरकडून आपला हात सोडवून घेते आणि गौरीला वाचविते. तेव्हापासून शेखर-मुग्धा वेगळे होतात. मुग्धा आपला भाऊ श्रीधर साने याच्याकडे पुण्याला राहायला जाते. चार-पाच वर्षांची झाली तरी गौरी बोलू शकत नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे तिची जडणघडण झाली तर ती बोलू लागेल असे मुग्धाला वाटते, परंतु ते अशक्य आहे असे डॉक्टर सांगतात. मुग्धाची धडपड सुरू असते. मग पुण्यातील स्पेशल चाइल्ड स्कूलमध्ये गौरीला प्रवेश मिळतो. सगळीच मुले विशेष मुले असतात. त्यांच्यात गौरीचे कसे होणार याची सतत काळजी मुग्धाला लागून राहते, परंतु गौरी शाळेत छान रमते. पोहण्याच्या व्यायामामुळे गौरीच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे सांगितल्यानंतर तिचे पोहणे सुरू होते. पाण्यात खेळण्याचा अपार छंद असलेली गौरी उत्तम जलतरणपटू बनते. स्पर्धात्मक जलतरणाचे प्रशिक्षक प्रतापराव देशमुख गौरीला प्रशिक्षण देतात आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचते.
गौरी गाडगीळने पडद्यावर साकारलेली स्वत:चीच व्यक्तिरेखा हे या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ आहे. मृणाल कुलकर्णीने मुग्धा गाडगीळ या व्यक्तिरेखेमार्फत विशेष मुलांच्या आईची भीती, आपण नसताना विशेष मुलांचे काय होणार, कसे होणार याची घालमेल, गौरीला यशस्वी झालेले पाहण्यासाठीची धडपड, तिचे प्रयत्न असे विविध कंगोरे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दाखविले आहेत. गौरी गाडगीळनेही प्रथमच पडद्यावर येऊनसुद्धा चांगला अभिनय केला आहे.
एक प्रकारे दिग्दर्शकाने कठीण, आव्हानात्मक विषय सोप्या पद्धतीने सांगण्याचा आणि सकारात्मकता बिंबवण्याचा प्रयत्न संवाद, छायालेखन, दिग्दर्शन व चित्रपटाच्या अन्य सर्व अंगांद्वारे केला आहे. सर्वसाधारणपणे चित्रपटाच्या कथानकात उतार-चढाव असतात, परंतु विशिष्ट विषयावरचा चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाच्या कथानकाचा आलेख चढता आहे. सकारात्मकता, प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्द दाखविण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. हृषीकेश जोशीने श्रीधर मामा या व्यक्तिरेखेद्वारे जीवनातील सकारात्मक विचार आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे याचे उत्तम दर्शन घडविले आहे. मनोज जोशीने शेखर गाडगीळ व्यक्तिरेखेद्वारे सर्वसामान्यपणे अशा विशेष मुलांच्या पालकांची होणारी घुसमट, एका बापाला होणारे दु:ख, पश्चात्ताप असे विविध कंगोरे उत्तम दाखविले आहेत. बंदिस्त पटकथा, नेटके दिग्दर्शन, उत्कृष्ट संवाद, चित्रपटाच्या विषयाला अनुसरून वापरलेले संगीत, पाश्र्वसंगीत आणि सर्वच कलावंतांचा उत्कृष्ट अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान ठरले आहे. चित्रपटाचे शीर्षक कुतूहल निर्माण करणारे आहे. पिवळ्या रंगाचा एक मासा हा गौरीच्या यशामागची प्रेरणा आहे अशा पद्धतीने रूपकात्मक वापर दिग्दर्शकाने केला आहे.
यलो
निर्माते – रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर
छायालेखक व दिग्दर्शक – महेश लिमये
कथा – क्षितिज ठाकूर, अंबर हडप, गणेश पंडित
पटकथा – अंबर हडप, गणेश पंडित, महेश लिमये
संगीत – कौशल इनामदार
कलावंत – मृणाल कुलकर्णी, गौरी गाडगीळ, उपेंद्र लिमये, ऋषिकेश जोशी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, प्रवीण तरडे, संजना राय, सागर तळाशिकर व अन्य.