बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुटका करण्यात यावी ही मागणी आता जोर धरु लागली आहे. पटकथा लेखिका कनिका ढिल्लोन हिने देखील “रियाला किती दिवस तुरुंगात ठेवणार?” असा सवाल करत तिच्या सुटकेची मागणी केली आहे.
अवश्य पाहा – १० कलाकार अन् दिवस १००; पाहा ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक
“कट रचून सुशांतची हत्या झाली या थिअरीला आता काहीच अर्थ उरलेला नाही. तरी देखील रिया अद्याप तुरुंगातच आहे. सीबीआयने स्पष्ट केलंय की सुशांत प्रकरणात काहीच गडबड झालेली नाही. त्यामुळे आता आणखी किती दिवस रियाला तुम्ही तुरुंगात ठेवणार आहात? राष्ट्रीय महिला आयोगाने यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावी.” अशा आशयाचं ट्विट करुन कनिका ढिल्लोन हिने रियाच्या सुटकेची मागणी केली आहे.
अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी
While d conspiracy theories r being mulled over- A young woman is still in Jail #rheachakroborty @Tweet2Rhea CBI has clearly stated no foul play… how long n under what charges can she be kept in jail- And denied bail?? @NCWIndia can anyone give some answers pls?!
— Kanika Dhillon (@KanikaDhillon) October 5, 2020
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.