मॉडेल रेहा पिल्लई आणि टेनिसपटू लिएंडर यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. यापूर्वी लिएंडर पेसने रेहा हिच्याविरोधात कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करताना तिच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर गुरूवारी रेहाने वांद्रे पोलिस ठाण्यात पेसने कार्टर रोड येथील घरातून आपल्याला बाहेर काढल्याची तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरा एका पार्टीवरून घरी परतल्यानंतर पेसने आपल्याला घराबाहेर हाकलून दिल्याचे रेहा पिल्लईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लिएंडर पेस आणि रेहा पिल्लई गेल्या काही वर्षांपासून लिव्ह-इन नात्यात राहत असून, त्यांना आठ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मुलीचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात रेहाविरुद्ध याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत रेहा हिचे परपुरूषाशी संबंध असून, आपल्या मुलीच्या देखभालीकडे रेहा व्यवस्थितप्रकारे लक्ष पुरवित नसल्याचे आरोप पेसने केले होते. आपल्या मुलीला घेऊन रेहा   नातेवाईकांच्या घरी पार्टीसाठी गेली होती. या पार्टीवरून घरी परतल्यानंतर पेसने मला घरात येण्यापासून मज्जाव केल्याचे रेहाने आपल्या तक्रारीत सांगितले आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांना घेऊन रेहा आपल्या घरी आली तेव्हा, पेसने रेहाचे सर्व वस्तुंसकट तिचे सामान बांधून ठेवले होते. मात्र, लिएंडरने अशाप्रकारचे कोणतेही कृत्य केले नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

Story img Loader