‘रहना है तेरे दिल मे’ हा दिया मिर्झा आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या सिक्वेलच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. अशीही चर्चा आहे की, या सिक्वेलमध्ये क्रिती सेनन आणि विकी कौशल हे प्रमुख भूमिकेत दिसतील.
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, मूळ चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी यांनी केली होती. तर या रिमेकची निर्मिती त्यांचा मुलगा करत आहे आणि तो या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असून प्रत्येक गोष्टीकडे स्वतः जातीने लक्ष देत असल्याचं वृत्त आहे. विकी आणि क्रिती या दोघांशी या चित्रपटासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
View this post on Instagram
दोन्ही कलाकारांनी या चित्रपटाबद्दल पसंती दर्शवली आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता अद्याप बाकी असली तरी हा चित्रपट २०२२ पर्यंत प्रदर्शित करण्याबाबत निर्मात्यांचा विचार सुरु आहे. या चित्रपटाच्या टीमची सध्या दिग्दर्शक रवी उद्यवर यांच्याशी चर्चा सुरु आहे. मात्र ते सध्या ‘युध्रा’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. ते पूर्ण झाल्यावर या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
‘रहना है तेरे दिल मे’ हा चित्रपट ‘मिन्नले’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. या तमिळ चित्रपटातही आर माधवनने प्रमुख भूमिका साकारली होती तर त्याच्यासोबत अभिनेत्री रिमाने काम केलं होतं. दिग्दर्शक गौतम मेनन यांनी तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्री दिया मिर्झाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेता सैफ अली खानही यात महत्त्वाच्या भूमिकेत होता. अनेक वर्षे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम होती.